Aditya Thakrey in Manmad Meeting
Aditya Thakrey in Manmad Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मी सांगतो, चाळीस गद्दारांचे सरकार ताप्तुरते आहे, ते जाणारच!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakrey) यांचे नाव घेता, शिवसैनिक म्हणवता अन् पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thakrey) गद्दारी करता?. तुम्ही गद्दारी करायला सुरत आणि गुवाहाटीला गेलात. एकीकडे लोक महापुरात मरत होते व दुसरीकडे हे चाळीस गद्दार मजा मारीत होते. त्यांनी फक्त शिवसेनेशी (Shivsena) नव्हे तर माणुसकीशी गद्दारी केली आहे. त्यांना कधीही जनतेची साथ मिळणार नाही, असा दावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. (Maharashtra will never forgive Shivsena rebel mla)

युवासेना प्रमुख ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात झाली. यावेळी आदित्य ठाकरेंना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी पाच हजार कार्यकर्ते घेऊन ठाकरे यांना निवेदन देणार असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात त्यांची ठाकरे यांच्याशी भेट झालीच नाही. त्यामुळे याबाबत निर्माण झालेली उत्सुकता हवेतच विरली. श्री. ठाकरे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर थेट कार्यक्रमाला गेले.

यावेळी झालेल्या मेळाव्यात श्री. ठाकरे म्हणाले, शिवसेनेला सोडून गेलेले चाळीस गद्दार रोज नवी कारणे देत आहेत. विधीमंडळात हे कोणाशीही नजर मिळवण्याची हिंमत करू शकत नव्हते. आता ते दादागिरीची भाषा करीत आहेत. मात्र मी त्यांना सांगतो दादागिरीचे दिवस गेले. दादागिरी करून काहीच होत नाही. तुम्ही जनतेची सेवा करा, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. मात्र गद्दारी केली आहे, आता ते तुम्हाला मातीतच घालतील.

लोक म्हणतात, राजकारण वाईट असतं. या चाळीस लोकांनी ते अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे, असे सांगून ठाकरेंनी उपस्थितांना विचारले, तुम्ही या गद्दारांबरोबर रहाल का?. तेव्हा उपस्थितांनी आमदार कांदे गद्दार. गद्दारांबरोबर जाणार नाही. शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. अनेक कार्यकर्ते यावेळी त्वेषाने बंडखोरांना लाखोली वाहात होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, माझ्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे घराण्याचे संस्कार आहेत. त्यामुळे मी सोडून गेलेल्या आमदारांविषयी वाईट बोलणार नाही. माझ्या मनात त्यांच्या विषयी कोणतिही वाईट भावना नाही. मात्र त्यांनी जे शिवसेना, शिवसेनेचे कार्यकर्ते व मतदारांच्या भावनेशी खेळ केला, त्याबाबत त्यांना कधीही माफी मिळणार नाही.

मला व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजकारण कळत नाही, हे मी मान्य करतो. कारण बाळासाहेबांनी आम्हाला ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे संस्कार दिले आहेत. तोच शिवसेनेचा मंत्र आहे. आम्हाला राजकारण करता आले नाही, त्याबाबत मी माफी मागतो, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, आम्ही जर राजकारण केले असते, तर ज्या आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला, तो ठेवला नसता. आम्ही विरोधी पक्षांना त्रास दिला असता. स्वतःच्या आमदारांवर ते काय काय करतात, याबाबत लक्ष ठेवले असते. विरोधकांच्या विरोधात पोलिस व अन्य यंत्रणांचा ससेमीरा लावला असता. विरोधकांना नोटीस पाठवल्या असत्या, ते शक्य होते. मात्र तसे आम्ही केले नाही. आम्ही फक्त महाराष्ट्राच्या हितासाठी काय काय करता येईल तेव्हढेच केले. अहोरात्र राज्याच्या प्रगतीसाठी काम केले.

यावेळी संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, आमदार किशोर दराडे, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जयंत दिंडे, सुनिल बागूल, माजी आमदार वसंत गिते, राजाभाऊ वाजे, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप, नगरसेवक विलास सिंदे, अय बोरस्ते, माजी आमदार अनिल कदम यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT