Nitesh rane, Aaditya Thackeray
Nitesh rane, Aaditya Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News: शिल्लक सेनेत आदित्य सरपंच तरी होईल का?; ‘भावी मुख्यमंत्री’च्या बॅनरवरून भाजप नेत्यानं डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

Nashik : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'भावी मुख्यमंत्री'पदाची बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक ठिकाणी बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालं होतं. आता या पंक्तीत आदित्य ठाकरे यांचंही नावाचा समावेश झाला आहे. नागपूर येथे आदित्य ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री म्हणून झळकावण्यात आलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याचवरुन भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं आहे.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ मनसर येथे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) 'राज्याचे भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. नागपूरमधील उद्धव ठाकरे गटाच्या युवासेनेतर्फे हे बॅनर लावण्यात आले आहेत. याचवरुन भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शिल्लक सेनेत आदित्य सरपंच तरी होईल का? असा बोचरा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विचार करुन बॅनर लावावेत असंही राणे यावेळी म्हणाले.

भाजपचे आमदार नितेश राणे(Nitesh Rane) त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाद्वारासमोर धूप दाखविण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर महाआरती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे.

राऊत टेबल पत्रकार....

संजय राऊत टेबल पत्रकार आहेत. त्यांना किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. तुझ्या मालकाने नवीन मातोश्री का बांधली? देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच वर्षाच्या काळात बाळासाहेबांचे स्मारक तरी बांधू शकले का ? असा सवालही राणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

राणे नेमकं काय म्हणाले?

नितेश राणे म्हणाले, मी त्र्यंबकेश्वर मंदिरात आरती करायला चाललो आहे. धर्मामध्ये आरती करणं, आमची जबाबदारी आहे. हक्क आहे. धर्मावर होणारे अन्याय आम्ही थांबवू शकले नाही तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी महाआरती करणार आहे. हे आक्रमण हिंदू धर्माच्या विरोधात होत आहे. जे काही हल्ले आमच्या हिंदू धर्मावरती होत आहे, ते थांबवण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत असंही राणे म्हणाले.

राज ठाकरेंना टोला...

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीवर संदलचा धूप फिरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू-मुसलमानांमध्ये अशाप्रकारे सख्याच्या गोष्टी सुरु आहेत. या गोष्टी सुरुच राहिल्या पाहिजेत. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला म्हणून हिंदू धर्म भ्रष्ट होईल, इतका तो काही कमकुवत आहे का, असा परखड सवाल विचारत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन रान उठवणाऱ्यांना फटकारले.

यावर नितेश राणेंनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मी काय राज ठाकरे(Raj Thackeray)यांना क्रॉस करणार नाही. पण तिथे स्पष्ट लिहिलं आहे की, हिंदूंशिवाय इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणी ढवळाढवळ करू नये. आमचा आजचा दौरा गावकऱ्यांच्या इच्छेनुसार लागला आहे. ज्यांचा विरोध आहे, त्यांनी समोर यावं आणि भूमिका मांडावी असंही राणे यांनी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT