Eknath Shinde & Dada Bhuse
Eknath Shinde & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ शिंदे मालेगाव जिल्ह्याची घोषणा करणार का?

Sampat Devgire

मालेगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शनिवारी मालेगावचा (Malegaon) दौरा करीत आहेत. या दौऱ्यात ते माजी कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना राजकीय बळ देण्यासाठी कोणत्या घोषणा करणार याची उत्सुकता आहे. गेली अनेक वर्षे चर्चेत राहून बाजुला पडलेला मालेगाव जिल्हा यावेळी ते घोषीत करतील काय याची चर्चा आहे. (CM Eknath Shinde will visit Malegaon on Saturday)

राज्यातील सत्ता स्थापनेनंतर आपला गट व तटबंदी भक्कम करण्यासाठी राज्यात दौरा करणार आहेत. ‘मुख्यमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमातून त्यांनी या दौऱ्याला सुरवात केली आहे. यासाठी त्यांनी मालेगाव शहराची निवड केली आहे.

या दौऱ्यातून ते विश्‍वासू सहकारी वरिष्ठ मंत्री दादा भुसे व बंडखोर आमदार सुहास कांदे यांना बळ देणार आहेत. यानिमित्त ३० जुलैला होणाऱ्या सभेत शक्तिप्रदर्शन होईल. दौऱ्यासाठी मालेगावची निवड झाल्याने विभागाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री मालेगाव जिल्हा की मांजरपाडा-२ व वांजूळपाडा यांची घोषणा करणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे.

शिवसेनेच्या उठावात उत्तर महाराष्ट्राने श्री. शिंदे यांना मोठे पाठबळ दिले. वरिष्ठ मंत्री असलेले भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह सहा आमदारांनी अपक्ष मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांची पाठराखण केली. राज्यातील ऐतिहासिक व राजकीय घडामोडीत नाशिक व उत्तर महाराष्ट्र नेहमी आघाडीवर राहिला आहे.

पुलोदच्या प्रयोगात शरद पवारांची जिल्ह्याने एकमुखी पाठराखण केली होती. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे बंडही चर्चेत राहिले होते. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तांतरानंतर उठावात सहभागी झालेल्या ज्येष्ठ मंत्री व आमदारांच्याही आशा वाढल्या आहेत. सत्तांतरानंतर जनहिताचे निर्णय व्हावेत. प्रलंबित कामे व प्रकल्प मार्गी लागावीत, अशा साऱ्यांच्या अपेक्षा आहेत. मालेगाव जिल्ह्याची मागणीही गेल्या चार दशकांपासून होत आहे. मांजारपाडा प्रकल्प-२ व वांजूळपाडा या मागण्याही जुन्याच आहेत. प्रशासकीयदृष्ट्या नाशिक जिल्ह्याचे विभाजन करणे काळाची गरज झाली आहे. मात्र अन्य काही जिल्ह्यांच्या मागण्या असल्याचे सांगून या मागणीला सातत्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. याउलट ठाणे, नंदुरबार अशा काही जिल्ह्यांचे विभाजनही झाले आहे.

मांजरपाडा-२ प्रकल्पाचा फायदा संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला होणार आहे. पश्‍चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी झाल्यास गिरणा, तापी खोरे सुजलाम-सुफलाम होईल. सत्तांतरापूर्वी ६ मार्चला श्री. भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. शिंदे मालेगाव दौऱ्यावर आले होते. त्या वेळी श्री. भुसे यांनी त्यांच्याकडे शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या निधीसाठी २०० कोटींची मागणी केली होती. अवघ्या एक महिन्यात शहरातील रस्ते विकासासाठी १०० कोटी मंजुरीची घोषणा झाली. यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना साकडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकात्मता चौकातील पोलिस कवायत मैदानावर ३० जुलैला जाहीर सभा होणार आहे. सभेत त्यांना मालेगाव तालुकावासीयांतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. यात जिल्हा निर्मितीची मागणी अग्रणी आहे. याबरोबरच पश्‍चिम वाहिनी नार-अंबिका-पार-औरंगा या पूर्व वाहिनी करून गिरणा-तापी खोऱ्यात पाणी वळविणे, महापालिका अमृत योजना टप्पा-२ पाणीपुरवठ्यासाठी ८६ कोटी, तर मलनिस्सारण योजनेसाठी साडेचारशे कोटी रुपये उपलब्ध करून देणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी एकात्मता चौकातील बांधकाम विभागाची जागा व दोन कोटी निधी देणे आदी मागण्या करण्यात येणार आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT