Girish Mahajan
Girish Mahajan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गिरीश महाजनांची घोषणा होताच नेत्यांपेक्षा `प्याद्यांचीच ऊठबस वाढली!

Sampat Devgire

नाशिक : महापालिका (NMC) निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील (BJP) पडझड थांबविण्यासाठी संकटमोचन म्हणून उल्लेख होणारे गिरीश महाजन यांच्याकडे प्रभारी पदाचा कार्यभार सोपविल्यानंतर आतापर्यंत गडप झालेल्या पडछाया पुन्हा एकदा गडद होण्यास सुरवात झाल्याने पहिले पाढे पंचावन्न असेल तर भाजपला कसे यश मिळेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची खेचाखेची सुरू आहे. त्यात मागील आठवड्यात भाजपचे तीन व अपक्ष अशा चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने गिरीश महाजन यांची नाशिकच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली. तर जयकुमार रावल यांच्याकडे सहप्रभारी कार्यभार सोपविण्यात आला. महाजन व रावल यांच्या कामाची बेरीज-वजाबाकी करताना महाजन यांनी यापूर्वी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाचा लाभ पक्षाला करून देण्याचा उद्देश आहे. मागील निवडणुकीत महाजन यांनी शिवसेना, मनसेला खिंडार पाडले. पोट निवडणुकीत तीन जागा निवडून आणल्या. त्यानंतर महापालिकेत पूर्ण बहुमताने सत्ता आणली. ग्रामिण भागातही भाजपचा विस्तार केला. जिल्हा बॅंका, सहकार क्षेत्रात भाजपचे कमळ फुलविले. विशेष म्हणजे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थकांनी स्वतंत्र गट तयार करून भाजपला धक्का देण्याचे जवळपास निश्‍चित झाले.

त्यावेळी फुटलेल्या सर्व नगरसेवकांना माघारी आणण्याचे महाजन यांचे कसब सार्थकी लागेल. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गिरीश महाजन यांचा संपर्क कमी झाला. जळगावमधील राजकारण व त्यांच्या समर्थकांवर आलेले संकट दूर करण्यात महाजन यांचा वेळ खर्ची पडू लागल्याने जयकुमार रावल यांच्याकडे नाशिकचा कार्यभार सोपविण्यात आला. रावल यांचा मितभाषी व शांत स्वभाव, अपुरा संवाद, नगरसेवकांवर अडचण येऊनही मदतीला धावून जाणे, यामुळे पक्षांतर्गत दुही माजण्यास सुरवात झाली. परिणामी नगरसेवक फुटू लागल्याने भाजपने पुन्हा संकटमोचकाचा धावा केला.

पडछाया गडद

गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद होते. त्याकाळात त्यांच्या नावे सरकारी कार्यालयांमध्ये विशिष्ट व्यक्तींचा वावर पाहिले जायचे व ते सुद्धा स्वतःला त्याचं पद्धतीने सादर करायचे. आता महाजन पुन्हा नाशिकमध्ये येणार असल्याने गायब झालेल्या पडछाया पुन्हा दिसू लागल्या असून, तेच लोक सूत्रे हलविण्याच्या तयारीत आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवार कोण ठरवायचा येथपासून सर्वच गोष्टी ताब्यात घेण्याची लगबग सुरू झाल्याने पहिले पाढे पंचावन्न म्हणत पक्षातील जुनेजाणते दूर जाण्यास सुरवात झाली आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT