Bharat Kokate News, MLA Manikrao Kokate News in Marathi
Bharat Kokate News, MLA Manikrao Kokate News in Marathi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार माणिकराव कोकाटेंना मिळणार भारत कोकाटेंचे थेट आव्हान!

Sampat Devgire

सिन्नर : आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद (Nashik) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर झाला. नव्या रचनेमुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या कुटुंबात महाभारत रंगणार आहे. आमदारांची कन्या सिमंतीनी कोकाटे (Simantini Kokate) यांना आमदारांचे सख्खे भाऊ भरत कोकाटे (Bharat Kokate) यांचे प्रबळ आव्हान ठरेल. निवडणूक जिल्हा परिषदेची मात्र निकाल आमदारकीचा अशी स्थिती आहे. (New ZP structure will be a political challange for established leaders)

(MLA Manikrao Kokate News in Marathi)

सिन्नर तालुक्यात एका नवीन जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीच्या दोन गणांची भर पडली आहे. मात्र, नव्या रचनेत मातब्बरांना धक्का बसणार असून अनेकांचा जिल्हा परिषद, पंचायत समितीत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एकूणच सिन्नरमधील राजकीय धामधुमीत 'कही खुशी-कही गम' चे चित्र बघायला मिळते आहे.

काका-पुतणीमध्ये संघर्ष?

आमदार माणिकराव कोकाटे यांचा बालेकिल्ला राहिलेला पूर्वीचा शहा गट आता सोमठाणे या नावाने ओळखला जाईल. या ठिकाणी कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्यासाठी आज घडीला बालेकिल्ला अभेद्य मानला जात असला तरी कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. काका व पुतणी यांच्यातील संघर्ष सोमठाणेत बघायला मिळेल. पूर्वीच्या नांदुरशिंगोटे गटाचे विभाजन होऊन या गटातील गावे पांगरी बुद्रुक दापूर व नांदुर-शिंगोटे या नवीन गटांमध्ये विभागली गेल्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब वाघ, विद्यमान सदस्य नीलेश केदार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

नांदूर गटाचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेल्या पांगरी बुद्रुक गटावर आमदार कोकाटे गटाचा वरचष्मा असून वावीचे माजी सरपंच विजय काटे यांची लॉटरी जिल्हा परिषदेसाठी लागू शकते. शिवसेनेकडून या गटात बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ यांचे नाव आघाडीवर आहे. राजेश गडाख हेदेखील या ठिकाणी चाचपणी करू शकतात.

गट व गण संरचनेत उलटापालट झाल्याने अनेक दावेदारांची स्वप्ने भंगली आहेत. हरकतीअंती अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असली तरी प्रारूप रचनेत फारसा बदल अपेक्षित नसल्याने इच्छूकांचे घोडे गंगेत न्हाले आहेत. सिन्नरमध्ये पूर्वी सहा जिल्हा परिषद गट होते, त्यात एका गटाची भर पडली आहे. माळेगाव, मुसळगाव, सोमठाणे, पांगरी बुद्रुक, दापूर, शिवडे व नांदूरशिंगोटे असे गट नव्या रचनेत अस्तित्वात येणार आहेत. पंचायत समितीमध्ये बारा ऐवजी १४ गण राहणार असून नायगाव, माळेगाव, गुळवंच, मुसळगाव, सोमठाणे, शहा, पांगरी बुद्रुक, वावी, डुबेरे, दापुर, पांढुर्ली, शिवडे, ठाणगाव, नांदुरशिंगोटे याप्रमाणे गणांची रचना असणार आहे.

सांगळे दाम्पत्यांसाठी लाभदायक

पूर्वीच्या दापूर गटातून प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी जिल्हा अध्यक्ष शीतल सांगळे अथवा त्यांचे पती उदय सांगळे यांच्यासाठी नवीन दापूर गट बलस्थान करू शकतो. याच गटात डुबेरे येथील नारायण शेठ वाजे यांच्याही नावाचा आग्रह होऊ शकतो. ठाणगाव गटाचे विभाजन होऊन शिवडे, नांदुरशिंगोटे व दापुरमध्ये गावे विभागली गेल्याने ठाणगावकर असलेल्या नामदेव शिंदे यांची देखील चिंता वाढली आहे. शिवडेचे सरपंच असलेल्या कोकाटे समर्थक प्रभाकर हारक, सोनांबेचे सरपंच व वाजे समर्थक गटाचे डॉ. रवींद्र पवार यांच्यात नवीन शिवडे गटात सामना अपेक्षित मानला जात आहे. माळेगाव गटात गेल्या निवडणुकीत अवघ्या एक मताने पराभूत झालेल्या सुदाम बोडके यांना कोकाटे गटाकडून पुन्हा संधी मिळू शकते.

मुसळगावमध्ये भाऊगर्दी शक्य

मुसळगाव गटात वाजे व कोकाटे गटाकडून इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. मतदार संघाची प्रारुप रचना पूर्वी निर्धारित केल्याप्रमाणेच जाहीर झाली असून त्यावर हरकती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुदत दिली आहे. सिन्नर मधील गट गणांच्या प्रारूप रचनांवर नजर टाकली असता हरकती आल्यास तर त्या कितपत निकाली निघतील असा प्रश्न आहे. कारण भौगोलिक रचना लक्षात घेऊनच मतदार संघाचे प्रारुप रचना जाहीर करण्यात आली असून हरकती दाखल करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारे पुरावे देखील सादर करावे लागणार आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT