Highway condition
Highway condition Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत

Sampat Devgire

मुंबई : अतिवृष्टीमुळे (Heavy rains) खराब झालेल्या मुंबई- नाशिक (Mumbai-Nashik) आणि मुंबई-गोवा (Mumbai Goa) महामार्गासह (Highway) राज्यातील सर्व खराब झालेल्या महामार्गांची तातडीने दुरुस्ती (Urgent Repairing) करण्याची आवश्यकता आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी (up to 15 October) सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रीत खडीने भरण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अपर मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik) यांनी आज दिले.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग (सा.बां.) चे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के. सुरवसे आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सुमारे १८ हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची आणि देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आहे. चार पदरी आणि त्यावरील राष्ट्रीय महामार्ग हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत आहेत. दि. १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्ग मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या दोन महामार्गांसह राज्यभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच १५ ऑक्टोबरपूर्वी खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी अपर मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांनी कोकणात क्षेत्रीय स्तरावर मुक्कामी राहून युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन वर्दळीच्या व जास्त पर्जन्यमान असलेल्या महामार्गांवर पावसाळ्यानंतर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे निर्देशही श्री. सौनिक यांनी यावेळी दिले. महामार्ग खराब झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्याच्या सूचनाही श्री. सौनिक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT