Mahavikas Aghadi MVA leaders meet election commission News: Sarkarnama
विदर्भ

Election Commission: खळबळजनक! मतदारयादीतून 20 गावं गायब ? निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा वादात,विरोधकांच्या संशयाला बळ

Maharashtra Voter List: आता काँग्रेसने निवडणुकीपूर्वी सर्व मतदारयाद्या तपासण्याचे निर्देश दिले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या गोंधळावर बोट ठेवून स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

Rajesh Charpe

Amravati News: विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मतचोराची मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. राहुल गांधी यांनी थेट भाजपवर महाराष्ट्राची विधानसभा चोरल्याचा आरोप केला आहे. यातही विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत महायुतीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशातच आता एक खळबळजनक बातमी विदर्भातून समोर आली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आल्याची शंकाही काँग्रेसने व्यक्त केली आहे. आता काँग्रेसने निवडणुकीपूर्वी सर्व मतदारयाद्या (Voter List) तपासण्याचे निर्देश दिले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या गोंधळावर बोट ठेवून स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या गोंधळात अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीने आणखीच भर टाकली आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रारुप यादीतून अनेक गावेच्या गावे गहाळ असल्याचे निदर्शनास आले आहे. अमरावती जिल्ह्यात तब्बल 20 हून अधिक गावं मतदारयादीतून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत आता माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी अंजनगावचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा 2025 निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 निर्वाचक गट व गणांची प्रारूपयादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना 25 सप्टेंबर रोजी देण्यात आल्या होत्या. त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्या वेळेत दाखल कराव्यात.

जि. प. आणि पं. स. निवडणुकीच्या मतदारयादीवर कसबे गव्हाणचे सरपंच शशिकांत मंगळे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व तहसीलदार अंजनगावसुर्जी यांच्या कार्यालयात हरकत दाखल केली आहे.

या आक्षेपात त्यांनी तालुक्यातील गट क्रमांक 10 कापूसतळणी, भंडारज, सातेगाव, असे तीन गट व अंजनगावसुर्जी तालुक्यातील गण खानमपूर पांढरी, कापूसतळणी, चौसाळा, भंडारज, सातेगाव व कोकर्डा अशा, सहा गणांच्या यादीमध्ये खानमपूर पांढरी गणामधील टाकरखेडा मोरे, कापूसतळणी गणामधील अहमदपूर (टाकरखेडा मोरे), धनेगाव, रौंदळपूर (कापूसतळणी), पोही, रत्नापूर (पोही), जवळा बु., जवळा खुर्द, औरंगपूर (कसबेगव्हाण), सैदापूर (कसबेगव्हाण), तर चौसाळा गणामधील डोंगरगाव (तूरखेड) व भंडारज गणामधील मलकापूर बु., अडगाव खाडे, नवापूर (अडगाव खाडे), मासमापूर (अडगाव खाडे), मूर्तिजापूर घोगर्डा (अडगाव खाडे), हसनापूर पार्डी, शिरजगाव (हसनापूर पार्डी), कारला, निमखेड आडे (कारला), जवर्डी, धुळकी आदी गावांची नावे मतदारयादीत नसल्याचे म्हटले आहे.

तसेच भोकरी हे गाव सातेगाव गणामध्ये टाकले असल्याचे आक्षेपात नमूद केले आहे. सातेगाव गणामधील हंतोडा, मोहब्बतपूर (हंतोडा), खुदानपूर (विहिगाव), अडगाव आडे (विहिगाव), गणेशपूर (निंभारी), तर कोकर्डा गणामधील सर्फाबाद (हयापूर) ही गावे यादीमधून गहाळ आहेत. यादी भाग अनुसार मतदार क्रम पृष्ठ क्रमांक दोन व तीन क्रमवार नसून चुकीच्या पद्धतीने मतदारयादीचे प्रारूप प्रसिद्ध केले असल्याचा आक्षेप दाखल केला आहे.

निवडणूक विभागाची एवढी मोठी चूक असताना कोणत्याही राजकीय पक्षाने वा तालुक्यातील धुरंधर राजकीय नेत्यांच्या लक्षात ही घोडचूक येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काही गावांची नावे सुटल्याचे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठविले असल्याचे तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT