Narendra Modi Dehu Visit, Narendra Modi Latest Marathi News Sarkarnama
विदर्भ

पंतप्रधान मोदींसाठी पुण्यात तयार झाली विशेष तुकाराम पगडी आणि उपरणी !

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी प्रथमच डिझायनर तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे. देहू संस्थानच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी ती तयार केली आहे.

Atul Mehere

पुणे : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू येथे येत आहेत. त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार सुमारे दीड तास ते देहुत थांबणार आहेत. या दरम्यान त्यांना तुकाराम पगडी आणि आणि उपरणी भेट देण्यात येणार आहे. (Narendra Modi Dehu Visit)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी प्रथमच डिझायनर तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे. देहू संस्थानच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील (Pune) सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्या कला वर्कशॉपमध्ये दोन पगड्या आणि उपरणी सजवण्यात आलेली आहेत. गेल्या शुक्रवारी १० जूनपर्यंत ही पगडी बघता येत होती. पण त्यानंतर रविवारी १२ जूनला सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही पगड्या आणि उपरणी देहू (Dehu) संस्थानच्या विश्वस्तांच्या सुपूर्द करण्यात आली.

देहूच्या विश्वस्तांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की, पंतप्रधान येत आहेत आणि त्यांना साजेशी डिझायनर पगडी तयार करा, त्यावेळी या पगडीवर काम सुरू केले. त्यापूर्वीही जेव्हा विश्वस्त पंतप्रधानांना दिल्लीला निमंत्रण द्यायला गेले होते, तेव्हा एक पांढऱ्या पगडी आम्ही बनवून दिली होती. त्या पगडीवरचाच फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. यावेळी नितीन महाराजांनी सांगितले की, आता डिझायनर पगडी तयार करायची आहे. त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली. या पगडीचा आकार सामान्य पगडीपेक्षा मोठा असतो. १२ मीटर रेशमी कापड वापरून ही तयार केली आहे, असे मुरूडकर यांनी सांगितले.

१० कामगार राबले १० दिवस..

मुरूडकर झेंडेवाले प्रतिष्ठानचे गिरीष मुरूडकर यांनी सांगितले की, तीन पिढ्यांपासून हा आमचा व्यवसाय आहे. पंतप्रधानांसाठी पगडी तयार करण्यासाठी १० दिवस लागले. यासाठी आमच्या १० कलाकारांच्या टिमने हे काम केले. ही पगडी तयार करताना व्यवसाय म्हणून विचारच केला नाही. कापड, इतर साहित्य आणि आमचे कामगार, कलाकार यांच्या रोजगाराचा खर्चच तेवढा आकारण्यात आला आणि तो १० हजार रुपयांच्या घरात आहे. पण ही पगडी पंतप्रधानांना घातली जाणार आहे, हाच आमच्यासाठी परमानंद असल्याचे गिरीष मुरूडकर यांनी सांगितले.

कपाळावर विठोबाची प्रतिमा..

या पगडीवर कपाळाच्या मध्यभागी विठोबाची प्रतिमा आहे. उजव्या आणि डाव्या कानाजवळ ज्ञानोबा तुकोबांच्या प्रतिमा आहेत. या पगडीवर झगमग, जरी, लेस, चकमक असे प्रकार जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायाला आवडेल, अशा सोबर पद्धतीने ही पगडी सजवण्यात आली आहे. पगडी साधी असूनही ती डीझायनर करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळांना फार महत्व आहे. त्यामुळे तुळशीच्या माळांचा वापर यात करण्यात आला आहे. गंधाचेही अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामध्ये चंदन आणि बुक्क्याचा वापर केला असतो. या पगडीचे वैशिष्ट्य म्हणजे गंध आधीच फिट केले आहे. पगडी घातल्यानंतर कपाळावर आपोआप ते गंध येतं. ते वेगळं लावण्याची गरज नाही.

मेटलचा वापर नाही..

ही पगडी बनवताना मेटलचा कुठेही वापर करण्यात आलेला नाही. हलकी होईल याची काळजी घेतली आहे. त्यावर एक अभंग घेतला आहे. तो यासाठी की, जगतगुरुंची पगडी पंतप्रधानांना घालायची आहे, त्यामुळे ते विचार त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्यापासून देशभर, जगभर पोहोचले पाहिजे. नितीन महाराजांनी जेव्हा बघितले तेव्हा ते म्हणाले की, यापेक्षा दुसरा अभंग घेतल्यास चांगले राहील. त्यामुळे मग रातोरात अभंग बदलवण्यात आला.

अष्टकोनी स्टॅंड..

पंतप्रधानांच्या पगडीला राजमुकुटासारखा मान आहे. त्यामुळे ही पगडी ठेवण्यासाठी अष्टकोनी स्टॅंड बनवण्यात आला आहे. पगडी ठेवण्याच्या जागेच्या बाजूला लालचुटूक रंगांचे मखमली लोड आहेत. त्यावर तुकाराम महाराजांचं आवडतं वाद्य चिपळ्यांची सजावट करण्यात आली आहे. वारकरी संप्रदाय टाळांशिवाय विचार करू शकत नाही. त्यामुळे टाळांची सजावट करण्यात आली आहे. त्याला काचेचे कव्हर न करता, प्लॅस्टिकचे कव्हर करण्यात आले आहे. जेणेकरून सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये.

उपरण्यावर हस्तलिखित अभंग..

पगडीसोबत उपरणे दिले आहे, तेसुद्धा रेशमी कापडाने तयार केलेले आहे. यालासुद्धा तुळशीच्या माळा आणि तुळशीचे मणी लावून सजावट केली आहे. मोदींनी हे उपरणे घातल्यानंतर त्यांच्या हृदयाचा जो भाग आहे, तेथे दोन्ही बाजूंनी हस्तलिखित अभंग आहेत. त्याचे वैशिष्ट्य़ म्हणजे एका बाजूला मराठीत, तर दुसऱ्या बाजूला हिंदीतील अभंग आहे. तुकोबा महाराजांनी हिंदी भाषेतसुद्धा लिखाण केलेले आहे, हे भारतभर आणि जगभर त्यातून पोहोचवता येणार आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी, स्व. अटलबिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेते अमिताभ बच्चन, इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्यासाठीही पगड्या, उपरणे तयार केल्याचे मुरूडकर यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

शिळा मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर मालवाडी येथे पंतप्रधान मोदी यांची संवाद सभा होणार आहे. नियोजित दोऱ्यानुसार आज दुपारी १.३५ ते ३.०५ या कालावधीत ते देहूत असणार आहेत. श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि प्रशासनाने त्यांच्या या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुख्य देऊळवाड्याला फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुख्य मंदिरात मोदींचे आगमन होताना वारकरी त्यांचे स्वागत करणार आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्येही आनंद आहे. त्यानंतर होणाऱ्या सोहळ्यात मोदींना पगडी आणि उपरणे भेट देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी दुपारी १.१५ वाजता पुणे विमानतळावर पोहोचतील. तेथून देहू हेलिपॅडकडे जाऊन १.३५ वाजता देहूत त्यांचे आगमन होईल. १.४० वाजता श्री संत तुकाराम महाराज मंदिराकडे प्रयाण आणि १.४५ वाजता मंदिर लोकार्पण व संवाद सभा होणार आहे. ते आटोपून ३.०५ वाजता ते हेलिपॅडकडे प्रयाण करतील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT