MSEDCL Bribe Sarkarnama
विदर्भ

MSEDCL Bribe : लाचखोरीचा कळस, लाच कशाची तर तांदळाची; एसीबीने केला ‘ट्रॅप’

ACB Action : चंद्रपुरात लाचखोरीच्या एकाच दिवशी दोन घटना

संदीप रायपूरे

MSEDCL Bribe : शासकीय काम करून देण्यासाठी पैशाची लाच मागण्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या, वाचल्या असतील. पण चंद्रपुरात लाचखोरीची अजबच घटना समोर आली आहे. वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याने चक्क 20 किलो तांदळाची लाच मागितली आहे. या कर्मचाऱ्याला एसीबीने रंगेहाथ ‘ट्रॅप’ केले आहे. शालेंद्र चांदेकर असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजुरा तालुक्यातील विरूर येथे अशा पद्धतीने लाच घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

विरुर गावात हा प्रकार समोर आला आहे. शेतातील पिकांना पाणी पुरविण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात कृषिपंप बसवितात, पण त्यांना यासाठी थ्री-फेज वीजपुरवठा गरजेचा असतो. राजुरा तालुक्यातील विरूर महावितरण कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून शालेंद्र चांदेकर हे काम करतात. विरुर हा शेतीबहुल परिसर आहे. या परिसरात अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात. अनेकांच्या शेतात पाणीपुरवठ्याची व्यवस्था आहे. चांदेकर हे स्वतः वीजपुरवठा खंडित करायचे, अन् तो जोडून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाच मागायचे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चांदेकरने पाच शेतकऱ्यांकडून वीज प्रवाह जोडण्यासाठी प्रत्येकी 20 किलो तांदूळ अन् 1 हजार 500 रुपये अशी एकूण 100 किलो तांदूळ व साडेसात हजार रुपयांची लाच मागितली. चक्क तांदळाची लाच मागणाऱ्या या महावितरण कर्मचाऱ्याच्या प्रतापाने शेतकरी संतापले. त्यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे यांपैकी काही शेतकऱ्यांनी या प्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले व इतर अधिकारी थक्कच राहिले. तांदूळ आणि पाच हजार रुपयांची लाच घेताना चांदेकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. चांदेकर याच्यावर या प्रकरणी चंद्रपूरच्या बल्लारपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामसेवकही अडकला

ब्रह्मपुरी पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत झिडबोली येथील ग्रामसेवक पुरुषोत्तम टेंभुर्डे याला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. फिर्यादी हा ठेकेदारीचे काम करीत असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी विविध कामे केली होती. या कामाचा 3 लाख ९० हजार रुपयांचा धनादेश ग्रामसेवक टेंभुर्डे यांनी ठेकेदाराला दिला. त्याच्या बदल्यात त्यांनी ठेकेदाराकडून 15 हजार रुपयांची मागणी केली. ठेकेदाराने या लाचखोरीच्या प्रकाराची तक्रार एसीबीकडे केली अन् ग्रामसेवकाला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एकाच दिवशी एसीबीने दोघांवर कार्यवाही केली आहे. लाचखोर आता तांदळाची मागणी करू लागल्याने अनेकांनी याबाबत आश्चर्य व तेवढीच चिंता व्यक्त केली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT