Chandrapur Protocol Dispute : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्याचा सपाटाच नेत्यांनी लावला आहे. गोंडपिपरी नगरपंचायतीच्या नवीन इमारतीचे काम अद्यापही पूर्ण व्हायचे आहे. मात्र 26 जानेवारी या प्रजासत्ताकदिनाच्या पर्वावर उद्घाटन करण्यासाठी घोडदौड सुरू झाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी नगरपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता आहे. अशावेळी आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते नगरपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचे ठरविण्यात आले. नगरपंचायतीने यासंदर्भातील पत्रिकाही प्रसिद्ध केल्या. पण काम पूर्ण झाले नसताना नेत्यांनी चालविलेल्या या अट्टहासासंदर्भात ‘सरकारनामा’ने वृत्त दिले अन् यानंतर गोंडपिपरीच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली.
‘सरकारनामा’च्या बातमीवरून घाईघाईत नगरपंचायतीला प्रोटोकॉलचा विसर पडल्याची भूमिका विरोधकांनी घेतली अन् नगरपंचायतीला रातोरात नवीन पत्रिका प्रसिद्ध कराव्या लागल्या. आता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नगरपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन उद्या (ता. २६) होणार आहे.
चंद्रपुरातील आदिवासी दुर्गम अन् अविकसित असलेला गोंडपिपरी तालुका नेहमीच उपेक्षित राहिला आहे. याच तालुक्याच्या भरवशावर राजू-याच्या शिलेदारांनी आजवर सत्ता भोगली. पण येथील शेतकरी, कष्टकऱ्यांना ते न्याय मिळवून देऊ शकले नाहीत. तालुक्यात तीन मोठ्या बारमाही नद्या वाहत असताना त्यांना या ठिकाणी सिंचनाची सुविधा उपलब्ध करता आली नाही. रोजगार नसल्याने येथील भूमिपुत्रांना भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील बेरोजगारांच्या झुंडीच्या झुंडी तेलंगणा राज्यात अल्प पगारावर काम करून पोट भरत आहेत.
राजुऱ्याचे आमदार कॉंग्रेसचे नेते सुभाष धोटे दुसऱ्यांदा या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. राजुरा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या राजुरा, कोरपणा, जिवती आणि गोंडपिपरी या चारही तालुक्यांतील बऱ्याच ठिकाणी त्यांच्याच स्थानिक शिलेदारांच्या हाती नेतृत्वाची दोरी आहे. देशात लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते अन् त्याच क्षणी आदर्श आचारसंहिता लागणार आहे. एकदा आचारसंहिता लागली की मग आपल्या क्षेत्रातील कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आपल्याला करता येणार नाही, याची जाणीव लोकप्रतिनिधींना झालेली आहे.
लगीनघाई करूनसुद्धा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. तरीही आमदारांकडून नगरपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन करण्याचा अट्टहास केला जात आहे, असे वृत्त ‘सरकारनामा’ने दिले. त्यानंतर राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा झाली. नगरपंचायतीने उद्घाटनाच्या पत्रिका प्रसिद्ध केल्या. यात आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे नमूद होते. पत्रिकेत कुठलाही प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याची बाब समोर आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मुद्द्यावरून विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाला रातोरात पत्रिका बदलावी लागली. नवीन पत्रिकेनुसार आता उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नगरपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. आमदार सुभाष धोटे अध्यक्षस्थानी असणार आहेत. याप्रसंगी विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले व जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती असणार आहे. गोंडपिपरीच्या नगराध्यक्षा सविता कुळमेथे या स्वागताध्यक्ष असणार आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.