Akola Accident Sarkarnama
विदर्भ

Namo Cup Tournament : अकोल्यात 'नमो चषक' स्पर्धेदरम्यान मोठी दुर्घटना; प्रेक्षक गॅलरीच कोसळली!

Accident During Namo Cup : 60 गंभीर जखमी तर 30-40 जणांना किरकोळ दुखापत, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : अकोला जिल्ह्यात सध्या नमो चषक अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येत आहे. याअंतर्गत बार्शीटाकळी येथे कब्बडीचे सामने घेण्यात आले. तर रविवारी स्पर्धेचा शेवटचा दिवस असल्याने प्रेक्षकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. परंतु, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने बांबूच्या साहाय्याने बनवलेली प्रेक्षक गॅलरी अचानक कोसळली आणि घडलेल्या दुर्घटनेत 60 पेक्षा अधिकजण जखमी, तर 30-40 जण किरकोळ जखमी झाले.

सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र इकडे महायुतीचा मेळावा होणार होता अन् तिकडे नमो चषक सामन्यात ही दुर्घटना घडली. या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात भारतीय जनता पार्टी विधानसभा मतदारसंघ, दगडपारवा येथील जय जगदंबा क्रीडा मंडळ दगडपारवा, श्री गजानन महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था, अकोला व बॉडी बिल्डींग अँड फिजीक स्पोर्टस् असोसियन यांच्या संयुक्त विद्यामाने 12 जानेवारीपासून सुरू असलेल्या महिला, पुरुष, खुली आमंत्रित नमो चषक कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने प्रेक्षकांची एकच गर्दी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कबड्डी चषकाचा आज शेवटचा दिवस होता व बक्षीस वितरण कार्यक्रम असल्याने बघणाऱ्यांची गर्दी वाढली होती. या ठिकाणी अपुऱ्या पडलेली बैठक व्यवस्था असलेल्या बांबूच्या प्रेक्षक गॅलरीत क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षकांनी मोठी गर्दी केल्याने प्रेक्षक गॅलरी पत्त्यासारखी कोसळली. यामध्ये शेकोडेंच्या संख्यने बसलेले प्रेक्षक क्षणार्धात ऐकामेकांच्या अंगावर कोसळल्याने यामध्ये 60 पेक्षा अधिकजण जखमी झालेत, तर 30 ते 40 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडल्याने एकच धावपळ उडाली.

घटनेतील गंभीर जखमींना अकोला सर्वोपचार रुग्णालय दाखल करण्यात आले. काहींच्या पाठीला, कंबरेला जबर दुखापत झाली, तर काहींच्या हात-पायांना मोठा मार लागल्याने त्यांना रुग्णवाहिकेने बार्शीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.

आयोजकांचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप!

बार्शीटाकळी तालुक्याचे ठिकाण व मोठी लोकसंख्या असलेल्या शहरातील ग्रामीण रुग्णालयात जवाबदार डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी नसल्याने गंभीर जखमी रुग्णांना अकोल्याला उपचाराकरिता रवाना करण्यात आले. यावेळी बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचून जखमींना मदत केली. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारना करून या घटनेला आयोजकांचा ढिसाळ कारभार जवाबदार असल्याचे मत व्यक्त केले.

मेळाव्यानंतर आमदार पिंपळे यांची धाव!

अकोल्यात महायुतीचा महामेळावा आज आयोजित करण्यात आला होता. दुपारी ही घटना घडली. आमदार हरीश पिंपळे यांच्या मतदारसंघात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पिंपळे यांनी घटनास्थळ गाठलं त्यांनी या घटनेतील अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली. यानंतर अशी घटना घडणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल असं म्हटलं आहे.

'वंचित'कडून गुन्हे दाखल करण्याची मागणी -

बार्शीटाकळी येथील घटना ही आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे घडल्याचा आरोप करीत आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. मात्र घडलेला हा केवळ अपघात असून यावर कुणीही राजकारण करू नये जखमींवर तातडीने उपचार करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडी ही प्रत्येकवेळी नकारात्मक होते. ते निराश- हताश झालेले लोक आहेत. प्रत्येक वेळी राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांनी करू अशी प्रतिक्रिया प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT