ACB Trap Sarkarnama
विदर्भ

ACP Trap Gondia : लाच घेतली सरपंच, उपसरपंचाने आणि मानगुटीवर प्रशासक बसला वडेगावकरांच्या !

अभिजीत घोरमारे

ACP Trap Gondia : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांवर लाच घेतल्याप्रकरणी अपर आयुक्तांनी अपात्र ठरविले. त्यामुळे सडक अर्जुनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अतुल डी. पवार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

पवार यांच्या नियुक्तीचा आदेश 22 फेब्रुवारी रोजी काढला आहे. एका मोठ्या नेत्याच्या दबावानंतर हा आदेश काढल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. अपर आयुक्तांनी वडेगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश काढले होते. ते आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले होते. मात्र यानंतरही आदेश काढण्यास विलंब केला जात होता. त्यामुळे प्रकरणाची वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याची चर्चा आहे.

वडेगावात येथे ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध बांधकाम साहित्य पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करण्यात आली होती. दरम्यान, बांधकाम साहित्याचे बिल मंजूर करण्यासाठी सरपंच रीना तरोणे, उपसरपंच दिनेश मुनेश्वर, ग्रामपंचायत सदस्य मार्तंड मेंढे, लोपा गजभिये यांनी पुरवठादाराकडे लाचेची मागणी केली होती. पुरवठाधारकाची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून 19 ऑगस्ट 2023 रोजी आरोपींना अटक केली होती. सरपंच, उपसरपंच व दोन ग्रामपंचायत सदस्यांनी पदाचा दुरुपयोग केल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39 (1) अपात्र ठरविले. या निर्णयाविरुद्ध या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाकडे अपील केले आहे. मात्र यावर कुठलाच स्थगिती आदेश प्राप्त झाला नाही.

सडक अर्जुनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. आर. सानप यांनी वडेगाव ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अतुल पवार यांची प्रशासक म्हणून पुढील आदेशापर्यंत नियुक्ती केली आहे. या काळात त्यांना सरपंचाचे अधिकार व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे. या संबंधीचे आदेश 22 फेब्रुवारी रोजी सानप यांनी काढले आहे. दरम्यान लोकशाही पद्धतीने निवडून दिलेले प्रतिनिधीच भ्रष्टाचारात अडकल्याने नाइलाजाने प्रशासक मानगुटीवर बसल्याची ओरड आता होऊ लागली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT