Bhandara Zilla Parishad Sarkarnama
विदर्भ

Bhandara Zilla Parishad : विनापरवानगी सीईओंची भेट शिक्षकाला भोवली

अभिजीत घोरमारे

Bhandara Zilla Parishad : विभागप्रमुखांची कोणतीही परवानगी न घेता थेट भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणे एका प्राथमिक शिक्षकास चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी आमगाव आदर्श प्राथमिक शाळेचे शिक्षक मुरलीधर कढव यांना शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस पवनी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत बजावली आहे. या प्रकरणामुळे ऊठसूट जिल्हा परिषदेत भटकणाऱ्या शिक्षक व शिक्षक नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पंचायत समिती पवनीअंतर्गत असलेल्या आमगाव आदर्श शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक पदावर मुरलीधर कढव कार्यरत आहेत. भंडारा जिल्हा परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत ते मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांना भेटण्यासाठी आले होते. शाळा सोडण्यापूर्वी तसेच शाळेत गैरहजर राहण्याविषयी विभागप्रमुखांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, प्राथमिक शिक्षक मुरलीधर कढव यांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमगाव आदर्श येथील ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच गावकऱ्यांसोबत कार्यालयीन वेळेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ संदर्भात ते विनापरवानगी तक्रार घेऊन गेले. ही बाब कार्यालयीन शिस्तीला अनुसरून नसल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या शासकीय नियमाचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

शिस्तभंगप्रकरणी शिक्षक मुरलीधर कढव यांना स्पष्ट खुलासा गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती पवनी यांच्यामार्फत तीन दिवसांच्या आत सादर करावा लागणार आहे, अन्यथा काही म्हणणे नसल्याचे गृहीत धरून प्रस्तावित केलेली शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या कारवाईनंतर स्वत: शिक्षक नेता म्हणून भंडारा जिल्हा परिषदेत वावरणाऱ्या शिक्षकांना चांगलाच चाप बसला आहे. त्यामुळे अजून किती शिक्षकांवर अथवा शिक्षकांमधील नेत्यांवर कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या कारवाईने शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT