Anil Bonde and Ajit Pawar
Anil Bonde and Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

पश्‍चिम महाराष्ट्रात ताडकन गेले असते, पण विदर्भात यायला अजित दादांनी उशीर केला !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : सुनील देशमुखांनी माहिती घ्यायला पाहिजे, निर्णय वाचायला पाहिजे. पीएम मित्रा अंतर्गत मेगा टेक्सटाईल पार्क जे होत आहेत. त्यामध्ये १३ राज्यांमधून १८ प्रस्ताव गेले आहेत. आपल्या राज्यातून दोन प्रस्ताव गेले आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर अमरावती (Amravati) जिल्ह्यातील नांदगाव पेठमधील मेगा टेक्सटाईल पार्क आहे. दुसरं तेवढ्याच मागास असलेल्या मराठवाड्यातील (Marathwada) ओरॅक येथील टेक्सटाईल पार्क आहे. मध्ये प्रदेशातून चार प्रस्ताव गेलेले आहेत. एका राज्याला एकच मिळेल, असे कॉंग्रेससारखे आमचे काम नाही, असा टोला खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी माजी मंत्री सुनील देशमुख (Sunil Deshmukh) यांना लगावला.

टेक्सटाईल पार्क औरंगाबादला (Aurangabad) नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप डॉ. सुनील देशमुख यांनी केला. त्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार बोंडे यांनी उपरोक्त टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी उपरोक्त दोन्ही टेक्सटाईल पार्क आणतील, असा विश्‍वास आहे. ज्या ठिकाणी कापूस पिकतो, त्या ठिकाणी हे मेगा टेक्सटाईल पार्क होणार आहेत आणि दोन्ही होतील, त्याबद्दल निश्‍चित रहावे, असा सल्ला खासदार बोंडे यांनी दिला आहे. कॉंग्रेसवाल्यांची आता मोठी गोची झाली आहे. एका विचित्र कोंडीत ते सापडले आहेत. त्यामुळे कुठुनही काही माहिती, भले ही ती मग अर्धवट का असेना, ते बरळत सुटतात, असा हल्लाबोल खासदार बोंडे यांनी केला.

सुनील देशमुख शिकलेले आहेत, अभ्यासू आहे. खरं पाहता त्यांनी या भानगडीत पडायला नको होतं. आधी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि आता भाजपमधून पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेले. त्यामुळे काहीतरी करत आहो किंवा मी काहीतरी केलं, हे दाखवण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या पक्षातून गेलेल्या लोकांना त्यांना पालापाचोळा म्हटले, याबाबत विचारले असता, खासदार बोंडे म्हणाले. आपल्याच पक्षातून गेलेल्या लोकांबद्दल बोलताना त्यांनाही दुःख होत असेल. पण आता ‘पचताने से क्या फायदा, जब चिडीया चुग गयी खेत’, पाखरांनी पूर्ण शेतातील पीक खाऊन टाकले. त्यामुळे तो शेतकरी आता कितीही कपाळावर हात मारून बसला, तर याचा काय उपयोग होणार आहे, असा खोचक सवाल त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना केला.

पश्‍चिम महाराष्ट्रात तातडीने पोहोचणाऱ्या अजित पवारांनी (Ajit Pawar) विदर्भात यायला उशीर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने हिंगणघाटमध्ये गेले. त्यानंतर लगेच चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला आणि कधी नव्हे, ती तातडीची मदत लोकांना मिळायला लागली. तातडीने पंचनामेसुद्धा झाले. पश्‍चिम महाराष्ट्रात जर विदर्भासारखा हाहाकार झाला असता, तर अजित दादा तातडीने गेले असते. हे लोक सत्तेवर असो किंवा विरोधात, या लोकांना विदर्भात पोहोचायला नेहमी उशीरच होतो, असे खासदार बोंडे म्हणाले. विदर्भात अजित दादांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. कारण विदर्भाच्या भल्यासाठी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा हातभार लागत असेल तर विदर्भातला खासदार म्हणून मला आनंदच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT