Ajit Pawar Death Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar Death : नागपूरच्या चिंतन शिबिरात अनेक नेत्यांनी अनुभवलेली अजितदादांची मार्गदर्शक ‘दादागिरी'

NCP Vidarbha News : नागपूरच्या चिंतन शिबिरात अजित पवारांनी दाखवलेली शिस्त, तत्काळ निर्णयक्षमता आणि जनतेसाठीची आक्रमक कार्यशैली आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना प्रकर्षाने आठवत आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जबर धक्का बसला आहे. महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर दादांनी विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी नागपूरमध्ये चिंतन शिबिर घेतले होते. हे शिबिर दादांचे रोखठोक भाषण आणि भूमिकेमुळे चांगलेच गाजले होते. याच शिबिरातून त्यांनी सर्व पालकमंत्र्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात जावेच लागले असे ठणकावून सांगितले होते, ज्यांना जमत नसेल, वेळ देता येत नसले त्यांनी खुर्ची रिकामी करा असेही त्यांनी बजावले होते.

अजित दादांच्या अकाली जाण्यामुळे या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे म्हणाले, स्पॉटवर जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चोवीस तासाच्या आत शासनादेश काढणार नेता आजवर बघितला नाही. करोनानंतर विदर्भात अतिवृष्टी झाली होती. वर्धा जिल्ह्यातील एका गाव पाण्याखाली बुडाले होते. शेतात आणि झोपड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यांच्या घरातील धान्य वाहून गेले होते. शेतकरी तीन दिवसांपासून उपाशी होते. ते मदतीच्या प्रतीक्षेत होते. त्यावेळी अजित दादा वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

वाटेत काही महिलांनी त्यांना आवाज दिला. त्यावेळी अजित दादांनी सर्व प्रोटोकॉल व सुरक्षा सोडून त्या महिलांना भेटायला गेले. अतिवृष्टीमुळे झालेले त्यांचे हाल जाणून घेतले. चिखल तुडवत शेतात गेले. झोपड्यांमध्ये जाऊन पाहणी केली. ते पाहून दादाही गहिवरले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब व्यवस्था करण्याचे फर्मान दिले. सोबतच चोवीस तासाच्या आत शासनादेश काढून मदत केल्याची आठवण राजाभाऊ टाकसाळे यांनी सांगितली. अशीच एक आठवण सावनेर तालुक्यातील नदीवर बंधाऱ्याची पाहणी करताना दादांनी चोवीस तासात निधी उपलब्ध करून दिला होता अशी त्यांनी सांगितली.

नागपूरच्या चिंतन बैठकीत दादांनी सभागृहाचे दारच बंद करण्याचा आदेश दिला होता. उशिरा आलेल्या अनेक नेत्यांची दादांनी चांगलीच कान उघडणी केली होती. याच शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ज्यांना गावात कोणी ओळखत नाही तो मुंबईतून पत्र घेऊन येतो आणि पदाधिकारी होतो असे सांगताना पालकमंत्री जिल्ह्यात फक्त शासकीय कार्यक्रमाला येतात, स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटत नाहीत , लोकांच्या समस्या ऐकून घेत नाहीत अशी तक्रार केली होती.

त्यानंतर दादांनी ज्यांना ज्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून नेमले त्यांना तिथे जावेच लागले, दर महिन्यात एकदा जिल्ह्याला भेट द्या, स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधा, त्यांना वेळ द्या असे आदेश दिले होते. ज्यांना जमत नसेल पक्षासाठी वेळ द्यायचा नाही त्यांनी खुर्च्या रिकाम्या करा असे परखड खडेबोलही दादांनी ठणकावत त्यावेळी सर्व मंत्र्यांना सुनावले होते. तसेच प्रत्येक मंत्री व नेत्यांवर आपली नजर असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT