Nagpur News, 31 Dec : 'लोग जुडते गये और कारवाँ बनता गया...' असा प्रकार महापालिकेच्या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर नागपूरमध्ये अनेकजण कुंपणावर उभे होते. पवार साहेबांसोबत राहायचे की अजित दादांकडे जायचे असा पेच अनेकांना पडला होता.
त्यावेळी एकही नगरसेवक सोबत आला नव्हता. आता मात्र महापालिकेच्या निवडणुकीत दादांकडे एकूण 10 माजी नगरसेवकांनी तिकिट मागितलं आहे. त्या सर्वांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक निवडून आला होता. दुनेश्वर पेठे हे शहर अध्यक्ष असल्याने त्यांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत राहण्याचे ठरवले.
इतर काही माजी नगरसेवक संभ्रमात होते. त्यानंतर माजी नगरसेवक राजेश माटे आले. ते प्रभाग क्रमांक 9 मधून नशीब आजमावत आहेत. चार सदस्यांच्या प्रभागातून अपक्ष निवडून आलेल्या आभा पांडे या राष्ट्रवादीत दाखल झाल्या. त्यांना राज्य महिला आगोयाचे सदस्य करण्यात आले होते. त्या प्रभाग क्रमांक 21 मधून यावेळी राष्ट्रवादीकडून लढत आहेत. तानाजी वनवे हे काँग्रेसचे महापालिकेत सत्तापक्ष होते. ते प्रदेश सरचिटणीस असून पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 27 मधून निवडणूक लढणार आहेत.
भाजपचे माजी नगरसेवक भगवान मेंढे यांचे तिकीट कापण्यात आले. ते आता प्रभाग क्रमांक 30 मधून भाजपच्याच विरोधत लढत आहेत. मनोज सांगोळे हे काँग्रेसचे नगरसेवक होते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बसपाकडून काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यास आणि महापालिकेची तिकीट देण्यास राऊत यांनी कडाडून विरोध केला होता.
ते यावेळी राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक दोनमधून लढत आहेत. आशा उईके या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. यावेळी त्या प्रभाग 8 मधून घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. प्रभाग क्रमांक 32 मधून भाजपचे माजी नगरसेवक राजकुमार नागुलवार आणि माजी नगरसेवक अशोक काटले पुन्हा लढत आहेत. हे दोन्ही नगरसेवक यापूर्वी राष्ट्रवादीतून निवडून आले होते. त्यानंतर नागुलवार हे भाजपात दाखल झाले होते.
मात्र त्यांच्या भाजपने दुर्लक्ष केले. त्यामुळे ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. रिपाइं आणि काँग्रेस असा प्रवास करणारे माजी नगरसेवक यशवंत मेश्राम यांनी हाताला घड्याळ बांधले आहे. त्यांची लढत त्यांचे सख्ये भाऊ, माजी नगरसेवक व अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य धर्मपाल मेश्राम यांच्याशी होणार आहे. माजी नगरसेवक दिलीप पनकुले अनेक दिवस तळ्यातमळ्यात सुरू होते. आता ते प्रभाग क्रमांक 16 मधून लढणार आहेत.
भाजपचे माजी नगरसेवक व अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य धर्मपाल मेश्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक यशवंत मेश्राम हे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. प्रभाग क्रमांक 27 मधील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर दोघांनीही दावेदारी दाखल केली आहे. या लढाईत मोठा भाऊ जिंकणार की लहान भाऊ याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.