Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : एक वर्षात ओबीसींसाठी काय केले, खरं तर याचं उत्तर भाजप नेत्यांनी दिलं पाहिजे !

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar's criticism of BJP leaders : भारतीय जनता पक्ष आमचा विरोधक पक्ष आहे. त्यांनी आमच्याबद्दल चांगलं बोलावं, ही अपेक्षाच नाही. पण काहीबाही आरोप करताना, आमच्याकडे बोट दाखवताना, त्यांची तीन बोटं त्यांच्याकडेच आहेत, हे तरी किमान त्यांच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. (Ajit Pawar responded to BJP state president MLA Chandrashekhar Bawankule's statement)

राष्ट्रवादी ओबीसींची विरोधक आहे, या आमदार बावनकुळेंच्या वक्तव्याबाबत आज (ता. ५) अजित पवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजप नेत्यांनी काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. पण वक्तव्यात काही तरी सत्यांश असावा, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आम्हाला माहिती आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत असताना ओबीसींनी प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. पण अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना ते मिळत होतं. या प्रकरणात मध्यप्रदेश सरकारने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

न्यायालयात मध्यप्रदेश सरकारच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर आम्ही मध्यप्रदेश सरकारसोबत संवाद साधला. बांठिया आयोगाने आपला अहवाल दिला. त्यावर आमच्या सरकारने निर्णय घेतला. हे प्रकरण न्यायालयात गेले. जो काही निकाल लागला, तो सर्वांसमोर आहे. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. त्या सरकारलाही आता एक वर्ष पूर्ण होत आले. या एक वर्षात त्यांनी ओबीसींसाठी काय केले, याचे उत्तर खरं तर भाजप नेत्यांनी दिले पाहिजे, असे म्हणत अजित पवारांना शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली.

या एक वर्षात सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या का? तर नाही घेतल्या. ओबीसींचा विषय निघाला की भाजप नेते आमच्याकडे बोट दाखवतात, पण हे करताना त्यांची तीन बोटे त्यांच्याकडेच आहेत, हे भाजप नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. व्ही.पी. सिंह यांच्या कार्यकाळात मंडल आयोग स्थापन झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रात होते. त्यांनी त्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यावर अंमलबजावणी झाली.

महाराष्ट्रालाच काय अख्ख्या देशाला या बाबा माहिती आहेत. आता मला जास्त खोलात जायचे नाहीये. आम्ही लोक बुद्धीला पटेल ते बोलत असतो. आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही काहीही करत नसतो. आमच्या नियोजनात ज्या बाबी आहे, त्या करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि आम्ही ते करतो, असेही अजित पवार म्हणाले.

सध्या दिल्लीवारी हा विषय चर्चेचा बनला आहे. यावर बोलताना पवार म्हणाले, कुणी दिल्ली (Delhi) वारी करा किंवा सुरत, गोवा (Goa) वारी करावी. मला त्याचं काही करायचं नाहीये. सध्या तुकोबारायांची वारी निघत आहे, आमच्यासाठी ही महत्वाची आहे, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी सत्ताधाऱ्यांचा अधिकार आहे. त्यांना वाटत असेल की, २० मंत्रीच चांगलं काम करत आहेत, तर ते विस्तार करणार नाहीत. त्यांना असं वाटत असेल की, मंत्रिमंडळात महिलांना स्थान न देऊन त्यांनी महिलांचा सन्मान केला आहे, तरीही ठीक. महिलांना अपमानित करणे त्यांना योग्य वाटत असेल तर, तेसुद्धा ठीक, असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) सरकारवर सडकून टिका केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT