NCP Wins against MNS Team Sarkarnama
विदर्भ

Cricketnama 2023 : अजित पवारांची 'POWER' चालली; 'MNS' संघाला दाखवला बाहेरचा रस्ता!

अभिजीत घोरमारे

NCP (AP) Lions Vs MNS Challengers : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) टीमचे कर्णधार प्रशांत पवार यांच्या पॉवर चालला आणि NCP (अजित पवार गट) लॉयन्स संघाने मनसे चॅलेन्जर्सचा पराभव केला.मनसेचे चार गडी टिपत अभिषेक यांनं केलेली हॅट्‌ट्रिक, जबरदस्त क्षेत्ररक्षण या विजयासाठी सहाय्यक ठरलं.

नाणेफेक जिंकत मनसेचे कर्णधार आदित्य दुरूगकर यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ‘सरकारनामाचे’ विभागीय वरिष्ठ प्रतिनिधी अतुल मेहेरे यांनी नाणेफेक केली. यावेळी ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत उपस्थित होते.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे मंगळवारी (ता. 12) दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार सामने खेळण्यात आलेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धेचा चौथा सामना टीम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (Ajit Pawar) लॉयन्स आणि मनसे चॅलेन्जर्स यांच्यात झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस टीमचे कर्णधार प्रशांत पवार यांनी अनिकेत आणि सारंग यांना सलामीला पाठवले. यशराज यांनी गोलंदाजीला सुरुवात केली. त्यात केवळ सात धावा एनसीपीला खात्यात जमा करता आल्या. आदित्य दुरूगकर यांनी संतुलित गोलंदाजी केली. परंतु दोन षटकांच्या समाप्तीनंतर कोणताही गडी न गमावता 19 धावा एनसीपीने खात्यात गोळा केल्या होत्या. निखिल झाडे यांच्या तिसऱ्या षटकात सारंग यांनी षटकार ठोकले. तीन षटकांपर्यंत 34 धावा राष्ट्रवादी संघाने मिळविल्या.

आदित्य दुरूगकर यांनी चौथं षटक टाकलं. त्यांचे चेंडू सारंग यांनी उत्तम प्रकारे टोलवलंत षटकार खेचले. चार षटकांच्या समाप्तीपर्यंत 47 धावा पवार गटाच्या ‘स्कोअरबोर्ड’वर होत्या. अखेरचं षटक अभिषेक यांनी टाकलं. सारंग आणि अनिकेत हे चांगले खेळत असताना चुकीच्या ‘कॉल’मुळे अनिकेत धावबाद झाले व पहिला गडी राष्ट्रवादी टीमने गमावला.

अनिकेत तंबुत परतल्यानंतर विशाल खांडेकर आले. मात्र ते येताच त्रिफळाचित झाले. सतीश शिंदे आल्यानंतर ते पीचवर धावले नाही, त्यामुळे ते धावबाद झाले. अमोल कांबळे हे देखील लगेच धावबाद झाले. त्यामुळे 4 गडी बाद 56 धावा राष्ट्रवादीने काढल्या.

मनसेने(MNS) फलंदाजीसाठी अभिषेक आणि निखिल झाडे यांना सलामीला पाठवले. परंतु सारंग यांनी अभिषेक यांना चौथ्याच चेंडूवर त्रिफळाचित केले, त्यांनी ‘मेडन ओव्हर’सह एक गडी त्यांनी टिपला. त्यामुळं पहिल्या षटकात मनसेला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर ऋषीराज फलंदाजीला आले. दुसरं षटक अभिषेक यांनी टाकलं. तेव्हा मात्र मनसेने धावांचं खातं उघडलं. दुसरं षटक झाल्यानंतर 1 बाद 11 ही मनसेची धावसंख्या होती.

सारंग यांनी तिसरं षटक अत्यंत संतुलित स्वरूपाचं टाकलं. तेव्हा मनसेला 13 चेंडूत 43 धावा विजयासाठी हव्या होत्या. चौथ्या षटकात विशाल खांडेकर यांनी कमी धावा देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी दत्ता सगुळकर यांची विकेट घेतली. सुजय यांनी फलंदाजीला आल्यानंतर धावा काढण्याचा प्रयत्न केला परंतु चोख क्षेत्ररक्षणामुळं त्यांना यश आलं नाही. 16 धावांवर 2 बाद अशी त्यावेळी धावसंख्या होती आणि 8 चेंडूत 41 धावा विजयासाठी मनसेला हव्या होत्या.

मनसेला 6 चेंडूत 40 धावा गरजेच्या असताना गौस यांनी अखेरचं षटक टाकलं. तेव्हा निखिल यांनी चौकार, षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फायदा झाला नाही. अखेर 1 चेंडूत 32 धावा अशक्य होत्या. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 31 धावांनी सामना जिंकला.

सामनावीराचा पुरस्कार सारंग यांना प्रदान करण्यात आला. ‘सरकारनामा’चे विभागीय वरिष्ठ प्रतिनिधी अतुल मेहेरे यांनी हा पुरस्कार प्रदान केला. नीलेश नातू आणि आकाश मांजरेकर यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT