Akola and Amravati Loksabha News : पश्चिम विदर्भातील राजकीय दृष्ट्या दोन महत्वाची शहरं असलेल्या अकोला आणि अमरावती लोकसभा मतदारसंघांत आपली राजकीय कारकीर्द गाजवीत ‘बाप’ माणूस ठरलेल्या दोन नेत्यांच्या ‘बेट्यांना’ उमेदवारी मिळावी, यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या दोन्ही तरुण चेहऱ्यांची नावे पक्षश्रेष्ठींपर्यंत गेली आहेत. त्यावरील निर्णय सध्या राखून ठेवण्यात आला आहे.
नागपूरनंतर महत्वाचे केंद्र असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी भगवा फडकविला. पूर्वी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या अडसूळ यांची राजकीय कारकीर्द चांगलीच प्रभावी राहिली आहे. कामगार नेते, सच्चे शिवसैनिक आणि विदर्भातील दोन मतदार संघांचे खासदार, उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांच्याजवळ प्रदीर्घ अनुभव आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या राणा दाम्पत्याने अशी काही चक्रं फिरवली की, अडसूळ यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यांचे सुपुत्र कॅप्टन अभिजित अडसूळही आमदार होते. सध्या मुंबईत मुक्कामी असलेले माजी खासदार अडसूळ यांना उद्धव ठाकरे गटाकडून मिळालेली वागणूक जगापासून लपलेली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते ठाकरे गटाकडून मैदानात उतरतील, याची शक्यता कमीच आहे. त्यातही आनंदराव अडसूळ यांचे वय व प्रकृती पाहता ते निवडणूक लढवतीलच याबद्दल खात्रीशीर सांगता येणार नाही.
आनंदराव अडसूळ यांनी निवडणूक लढविली नाही, तर त्यांचे पुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ यांना संधी मिळावी, अशी अमरावतीमधील त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. कॅप्टन अडसूळ तरुण चेहरा आहेत. नव्या उमेदीने ते काम करू शकतात. त्यांना विधिमंडळ कामाचा अनुभवही आहे. उच्च शिक्षणही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ‘कॅप्टन’चे ‘विमान’ दिल्लीच्या राजकीय आकाशात उंच झेपावे, अशी अनेकांची इच्छा आहे.
बडनेऱ्याचे विद्यमान आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची सध्या भाजपशी चांगलीच सलगी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राणा दाम्पत्य भाजपकडून मदतीची अपेक्षा करू शकतात, नव्हे करतीलच. राणांच्या निमंत्रणावरून भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कित्येकदा अमरावतीत जातात, त्यावरून तरी राणांना भाजप मदत करेलच असे स्पष्ट संकेत आहेत.
कॅप्टन अभिजित अडसूळ यांचे विमान राजकीय रडारवरून गायब करण्याचे राणांकडून पूर्ण प्रयत्न होतील, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. अर्थात लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे राजकीय समीकरण कसे बदलतात, यावरून कॅप्टन अडसूळ यांचा अमरावती टू नवी दिल्ली ‘टेकऑफ’चा ‘रनवे क्लिअर’ होईल का, हे कळेलच.
अकोल्याचा बाबतीत बोलायचे झाल्यास विद्यमान खासदार संजय धोत्रे हे भाजपचे सच्चे व कट्टर कार्यकर्ते आहेत. अकोला जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे पक्की करण्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलंय, यात दुमतच नाही. त्यामुळेच त्यांना मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. सध्या खासदार धोत्रे यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे ते पुढची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, हे स्पष्टच झालंय. परिणामी त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना संधी मिळावी, अशी अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे.
अनुप धोत्रे यांच्याशिवाय संजय धोत्रे यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे व अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांचीही नावं सर्वेक्षणातून पक्षश्रेष्ठींपर्यंत गेली आहेत. अकोल्याला नव्या उमेदीचा तरुण, तडफदार खासदार मिळावा, अशी येथील युवा कार्यकर्त्यांची अधिक इच्छा आहे. संजय धोत्रे यांनी आपल्या राजकीय जीवनात कमावलेला जनसंपर्क व मिळवलेल्या पुण्याईचे फळ कदाचित भाजप अनुप धोत्रेंना देईल, असे अकोला भाजपला वाटत आहे.
अमरावतीप्रमाणे अकोल्यातही राजकीय परिस्थिती वेगळी नाही..
अकोल्यातील धोत्रे गटाला शह देण्यासाठी भाजपमधील दुसरा गट नेहमीच संधीच्या शोधात असतो. धोत्रे गटातील तीनही संभाव्य उमेदवारांच्या लोकसभेकडे जाणाऱ्या मार्गात काटेरी गालिचा अंथरण्याचा प्रयत्न करीत धोत्रे विरोधक राजकीय ‘रण’ लढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या तरी धोत्रे गटाच्या राजकीय कुंडलीला ‘चंद्र’ प्रबळ पाठबळ देत असल्याने त्यांचे शत्रू बावनबावन करीत आहेत.
हिंदुत्व ही भाजपची जान आहे. त्यामुळे अनेक धार्मिक कार्यात धोत्रे गट चांगलाच सक्रिय असतो. परिणामी ‘देव’ही सध्या त्यांना चांगली साथ देत आहे. असे असले तरी धोत्रे गटाचे विरोधक अखेरच्या क्षणापर्यंत ‘रणात’ ‘जित’ मिळविण्याचा प्रयत्न करीत राहणार आहेत. अखेरच्या क्षणी रण कोण पटकावतो, हे पाहण्यासाठी अकोल्यातील राजकीय सामना रंजक ठरणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.