Akola News : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्यावर केलेल्या आरोपानंतर जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट)असा 'सामना'रंगला आहे.आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरीत आता 'या'प्रकरणातील तक्रारकर्त्या महिला सरपंचाने उडी घेतली आहे.
तक्रारकर्त्या महिला सरपंच डॉ.कल्पना पळसपगार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आमदार देशमुखांसह जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर आरोप केले आहेत.त्यामुळे अकोला जिल्ह्यात सध्या 'हा'मुद्दा आणखी रंगण्याची शक्यता आहे.आमदार देशमुख यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपनेही आमदार देशमुख यांच्यावर पलटवार केला होता.आता या प्रकरणी पुन्हा पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.
शेत रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या चुकीच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे (ठाकरे गट) गट नेते गोपाल दातकर यांना सदस्यपदावरून अपात्र करण्याचे षडयंत्र उपमुख्यमंत्री, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून रचले आहे,असल्याचा आरोप करत आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना 'फडतूस' म्हणून संबोधले होते.आणि ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, आता याच मुद्द्यावरून जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची तक्रार करणाऱ्या सरपंच डॉ. कल्पना पळसपगार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन गोपाल दातकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.उपमख्यमंत्री फडणवीस यांचा कोणताही हस्तक्षेप नसतांना त्यांचा अपमान करणे निंदनीय आहे.मात्र अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले हे आकसबुद्धीने केल्याचे सरपंच महिलेचे म्हणणे आहे.
तक्रारकर्त्या सरपंच महिलेने केला होता 'भाजप' प्रवेश!
जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर(Gopal Datkar) यांच्या गावच्या आणि त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या सरपंच महिला डॉ. कल्पना पळसपगार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सर्व तक्रारींमागे पक्षीय राजकारण आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आमदार देशमुख यांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणात भाजप विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) असा 'कोल्डवॉर ' सुरू झाला आहे. दातकर यांना सदस्यपदावरून अपात्र करण्याचे षडयंत्र उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून रचले आहे,असा आरोप आमदार देशमुख यांनी केल्यानंतर आता भाजप-शिवसेनेच्या ठाकरे गटात राजकीय वाद रंगला आहे.
" माझ्या घरात बंदूक ठेवण्याचा प्रयत्न..."
माझ्या घरात बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आराेप हिंगणी येथील सरपंचा तथा भाजप कार्यकर्त्या डॉ.कल्पना पळसपगार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख व गटनेते गोपाल दातकर त्यांच्यावर संशय असल्याचे त्या म्हणाल्या.डॉ.कल्पना पळसपगार यांच्या आईने ४ जुलै रोजी पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली होती.
सहा पोलीस कर्मचारी ३० जून रोजी माझ्या घरात घुसले. ते सिव्हील ड्रेसवर होते. त्यांनी आम्हाला तुमच्या घरात बंदूक आहे काय,हे पाहण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पाठवल्याचे सांगितले. राजकीय षडयंत्रातून फसविण्याच्या उद्देशाने बंदू असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली.
यामध्ये गोपाल दातकर व काही युवकांवर आमचा संशय आहे, असेही तक्रारीत नमूद केले. मात्र, तक्रारीत आमदार देशमुख यांचे नाव नाही. याबाबत सरपंच पळसपगार यांच्याकडे विचारणा केली असता मला हा संशय तक्रारीनंतर आल्याचे त्यांनी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.