Politics on Akola ROB Google
विदर्भ

Akola BJP : वंचितच्या आरोपांनंतर अकोल्यात भाजप नेत्यांचा ‘सेफ गेम’, दोन्ही अनुपला केले पुढं

जयेश विनायकराव गावंडे

Dabki Road ROB : अकोला शहरातील डाबकी रोड रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून वंचित बहुजन आघाडीनं भाजपवर टीका केल्यानंतर आता स्थानिक नेत्यांनी अत्यंत ‘सेफ गेम’ खेळलाय. यासंदर्भात कोणत्याही मोठ्या नेत्यानं प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत न पडता खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे आणि आमदार गोवर्धन शर्मा यांचे सुपुत्र अनुप शर्मा या दोन तरुण चेहऱ्यांना पुढं करण्यात आलय. शर्मा कुटुंबातील सदस्यानं यासंदर्भात आवाहन केल्यानंतर कुणी त्यावर फारसं भाष्य करणार नाही, असा विचार करीत हा तोडगा काढण्यात आला असावा, असं बोललं जातंय.

भाजपनं अवलंबलेल्या या कृतीमुळं वंचितला प्रत्युत्तरही मिळालं व त्यावरून कुणी वादही वाढविला नाही, असं एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचं लक्ष्य स्थानिक नेत्यांना साधता आलंय. विशेष म्हणजे डाबकी रोड रेल्वे पुलाचा लोकार्पण सोहळा हा शासकीय नव्हताच. तो भाजपचा खासगी कार्यक्रम होता, असं आता बांधकाम विभागानंही म्हटलंय. यावर भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटानंही यासंदर्भात तूर्तास मौन बाळगलंय. (Akola BJP Counter Attacks Vanchit Bahujan Aaghadi's Criticism on Inauguration of Dabki Road ROB)

भाजपनं या कृतीमुळं टीका करणाऱ्यांना त्यांचं प्रत्युत्तर मिळालं, परंतु खरोखर असं खासगी लोकार्पण करण्याची घाई काय होती हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. वाहनचालकांच्या सुविधेसाठी हा पूल खुला करायचाच होता, तर तो कोणताही कार्यक्रम न घेताही खुला करता आला असता. अशा प्रकारे राज्यात अनेक प्रकल्प यापूर्वीही सुरू झाले आहेत. तसंही पुलाचं काम अद्याप बाकी आहे. तेथे पथदिवे नाहीत. वाळू तशीच पडून आहे, मग सत्ताधारी एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटाला डावलत हा खटाटोप कुणी केला व काय सिद्ध करण्यासाठी केला, हा मूळ मुद्दा बाजूलाच आहे.

सोशल मीडियातून वंचितचे प्रदेश प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर यांनी आरोप केल्यानंतर खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांनी सोमवारी (ता. १३) दुपारी ०२.०२ वाजता भाजपच्या ग्रुपमध्ये मॅसेज टाकत यासंदर्भात काही जण गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप केला. आमदार लालाजी हे सर्वांसाठी पितृतुल्य होते. उड्डाणपूल त्यांना समर्पित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचं निधन झालं. त्याच दिवशी ते जनसेवेच्या कामाला लागले, असं प्रत्युत्तर धोत्रे यांनी टीका करणाऱ्यांना दिलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धोत्रे यांच्या या मॅसेजनंतर आमदार गोवर्धन शर्मा यांचे सुपुत्र अनुप शर्मा यांनी ०२.५२ वाजता यासंदर्भात मॅसेज पोस्ट करीत राजकारण न करण्याची विनंती केली. लालाजी सतत क्रियाशील असायचे. जनतेची सेवा हाच त्यांचा मूलमंत्र होता. उड्डाणपुलाचं लोकार्पण हे जनतेच्या सोयीसाठी असल्यानं ती लालाजींना खरी श्रद्धांजली आहे, असं अनुप शर्मा यांनी नमूद करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. डाबकी रोड उड्डाणपुलावरून सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून लोकार्पण करणारे आणि त्यावर टीका करणारे यांची दुखती नस वेगळीच असल्याची चर्चा आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT