prakash ambedkar Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 'या' मेळाव्याकडे लक्ष!

जयेश गावंडे

Akola Politics News : मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणेच अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. ३९ वर्षांची या मेळाव्याची परंपरा आहे. दरवर्षी धम्म मेळाव्याच्या जाहीर सभेत काय होणार, याची उत्सुकता भीम सैनिकांना असते. एकच नेता, विशाल मिरवणूक, प्रचंड प्रतिसाद आणि भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध असं आयोजन.

राज्याला सामाजिक आणि राजकीय दिशा देणारा मेळावा म्हणून या मेळाव्याकडे पाहण्यात येते. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर हे गेल्या अनेक वर्षांपासून या मेळाव्याला मार्गदर्शन करतात. याही वर्षी या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

देशात लवकरच लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. अकोला जिल्हा हा प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या गेल्या दहा निवडणुकांमध्ये अकोला मतदारसंघातून आपलं नशीब आजमावलं आहे. यापैकी दोनदा ते निवडणूक जिंकू शकले. या वेळी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. यावर्षी सलग अकराव्यांदा अकोला लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याने त्यापूर्वी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आगामी निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मतदारसंघांच्या बांधणीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचे संकेत देऊन आघाडीशिवाय स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशच आंबेडकरांनी दिलेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही 'साहेबांना' लोकसभेत पाठवण्यासाठी जिवाचे रान करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ कसा ताब्यात घेता येईल. यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः अकोल्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आंबेडकरांसह त्यांचा परिवारही खंबीरपणे साथ द्यायला मैदानात उतरला आहे. विविध धार्मिक उत्सवाच्या सहभागासह, आंदोलन, जिल्ह्यातील विविध प्रश्न यावर लक्ष देण्यात येत आहे.

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजन

दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. धम्म मेळाव्याचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात येते. दरवर्षी धम्म मेळाव्यात आंबेडकरी अनुयायांची अलोट गर्दी होते. विशाल, गर्जना करणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर राज्यभरातून धम्म मेळाव्याला हजेरी लावतो. नागपूरहून आपापल्या गावी परतणारी जनता आवर्जून अकोल्यात थांबून धम्म मेळाव्याला उपस्थित राहते. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण हे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे भाषण असते. त्याआधी शहरातून भव्य मिरवणूक निघते. त्यानंतर अकोला क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर या मिरवणुकीचे सभेत रूपांतर होते. या वेळी संपूर्ण आंबेडकर कुटुंब उपस्थित असते.

आगामी निवडणुकीमुळे मेळाव्याला विशेष महत्त्व

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर काय संदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पार पडलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या सभांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. गेल्या लोकसभेत राज्यात तब्बल ४२ लाख मते वंचितला पडली होती. विधानसभेच्या निवडणुकीतही स्वबळावर उभे असलेल्या वंचितने २४ लाख मते मिळवली. सलग अकराव्यांदा अकोला लोकसभा मतदारसंघातून अॅड. प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढविणार असल्याने या वर्षीच्या मेळाव्याला विशेष स्वरूप प्राप्त झाले आहे. मोदी सरकार, भाजप-आरएसएसवरील टीकास्त्र, 'इंडिया' आघाडीत 'वंचित' चा समावेश अद्यापही न झाल्याने त्यावरील भूमिका, आगामी निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीची राजकीय दिशा, शिवसेना ठाकरे गटासोबत झालेली युती यासह अनेक विषयांवर ही सभा गाजणार असण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT