योगेश फरपट
Akola news : लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत असून, मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे. तसा प्रचाराचा वेग वाढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उमेदवार, नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवित आरोप-प्रत्यारोप करत आहेत. बाइक रॅली, पदयात्रा, जाहीर सभा या माध्यमातून मतदारांपर्यत पोहाेचून आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आपला भर दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहेत.
राज्यात लोकसभेच्या 48 जागा असून, यासाठी पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार बुधवारी संध्याकाळी थांबणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघात अधिकाधिक प्रचार करण्यासाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीचे नेते सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M. Narendra Modi) , गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर केंद्रातील अनेक नेत्यांच्या सभा होत असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी जोर लावला आहे. विविध मतदारसंघांत नेत्यांच्या सभांच्या तोफा धडाडत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंगळवारी अकोल्यात मुक्कामाला होते. बुधवारी सकाळी त्यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंचे संतुलन बिघडलंय, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे विभाग (EOW) कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवारांना क्लीन चिट देण्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, हा चौकशीचा भाग आहे. या चौकशीमध्ये जे निष्पन्न झाले असेल ते लवकरच समोर येणार आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महायुतीमध्ये जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत. लवकरच राज्यातला सर्व जागांचा तिढा सुटेल, कुठे गुंता नाही. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह शिंदे गटाचे नेते आणि जिल्ह्यातील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
(Edited by : Chaitanya Machale)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.