Akola ZP Sarkarnama
विदर्भ

Akola ZP News : वादळी ठरली सर्वसाधारण सभा; २१ कोटी परत गेल्याच्या मुद्यावर घमासान !

ZP : निधी मिळाल्यानंतरसुद्धा अधिकारी खर्च का करत नाहीत?

सरकारनामा ब्यूरो

The issue of return of funds of Rs. 21 crores : जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांना उपलब्ध करुन दिलेला २१ कोटी रुपयांचा निधी परत गेल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाजला. जवळपास सर्वच विभागाचा निधी परत गेल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. (Department wise review was also conducted)

निधी मिळाल्यानंतरसुद्धा अधिकारी खर्च का करत नाहीत, निधीच्या खर्चाचे नियोजन का करत नाहीत, या व इतर प्रश्नांची सरबत्ती सभेत अधिकाऱ्यांवर करण्यात आली. यावेळी विभागनिहाय आढावासुद्धा घेण्यात आला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज (ता. २३) जि.प.च्या राजश्री शाहू मराहाज सभागृहात पार पडली.

सभेच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर व डॉ. प्रशांत अढाऊ यांनी विकास कामांसाठी मिळालेला किती निधी अखर्चित राहिला. निधी अखर्चित राहण्यासाठी कोण जबाबदार आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतरसुद्धा निधी खर्च का होत नाही, असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर प्रत्येक विभाग प्रमुखांनी उत्तर द्यावे, असा आक्रमक पवित्रा सदस्यांनी घेतला.

सभेत उपस्थित प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या कामाचा लेखाजोखा सादर केला. मिळालेला निधी, प्रत्यक्ष खर्च झालेला निधी व अखर्चित निधीची माहिती यावेळी विभागवार सादर करण्यात आली. शासनाकडून निधी मिळाल्यानंतरसुद्धा अधिकारी केवळ वेळकाढू कामे करतात. त्यामुळे जिल्ह्यात विकास होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण समिती सभापती माया नाईक, कृषी समिती सभापती योगिता रोकडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती रिजवाना परवीन, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, वंचितचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, राम गव्हाणकर, शिवसेनेचे गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ, सम्राट डोंगरदिवे, चंद्रशेखर चिंचोळकर, गजानन पुंडकर आदींची उपस्थिती होती.

जि.प.च्या (ZP) समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे वाटप योजनेवर याच विभागातील इतर योजनांवर तरतूद करण्यात आलेला २५ लाख, ११ लाख, १० लाख १० लाख व आठ लाखांचा निधी वळता करावा, असा ठराव वंचितचे (Vanchir Bahujan Aghadi) गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी मांडला. त्याला सभेत मंजुरी सुद्धा देण्यात आली.

आधीचे १ कोटी ५८ लाख व आताचे मिळून या योजनेसाठी एकूण २ कोटी २२ लाखांची तरतूद झाल्याचेसुद्धा त्यांनी सभेत सांगितले. या मुद्द्यावर कॉंग्रेसचे (Congress) सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी सर्व सदस्यांना लाभार्थी निवडीसाठी समसमान उद्दिष्ट वाटप करण्याचा मुद्दा उपस्थित केला. परंतु त्याला सरकट समर्थन न देता गटनेता सुलताने यांनी प्रत्येक सदस्याला निश्चित वाटा मिळेल, असे आश्वासन दिले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT