Govardhan Haramkar Death Case Sarkarnama
विदर्भ

Akot News: गोवर्धन मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, सर्व कॅमेरे सुरु नेमका कस्टडी रूमचा सीसीटीव्ही बंद

योगेश फरपट

Govardhan Haramkar Death Case: अकोट पोलिस स्टेशनमधील (Akot Police Station) गोवर्धन हरमकार या संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आता कस्टडी रुम समोरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा हा गेल्या सहा महिन्यापासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतर 5 कॅमेरे सुरु असून नेमका कस्टडी रुम समोरीलच कॅमेरा बंद कसा होता? असा प्रश्न आता वरिष्ठांकडून उपस्थित केला जात आहे.

अकोट पोलिस स्टेशन अंतर्गत मोबाईल चोरीच्या प्रकरणात गोवर्धन हरमकार (Govardhan Haramkar) याला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात संशयीम्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं. या युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. अकोट शहर पोलिसांतील PSI राजेश जवरे आणि इतर 3 पोलिस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी गोवर्धनला अटक केली होती. त्यानंतर 16 जानेवारीला सुकळी गावात त्याच्या घराची झडती घेतली. त्यानंतर गोवर्धनचे काका सुखदेव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. 16 तारखेला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिस स्टेशनमध्ये या दोघांनाही पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. मारहाणीच्या दुसऱ्याच दिवशी 17 जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिन्ही घटना अनुक्रमे, 15,16,17 असे तीन दिवस घडल्या होत्या. तर धक्कादायक बाब म्हणजे 18 जानेवारीदरम्यान पोलिस निरिक्षक तपन कोल्हे यांनी पोलिस स्टेशनमधील कस्टडी रुमचा सीसीटीव्ही बंद असल्याबाबत पोलिस अधिक्षकांना पत्र लिहले आहे.

पोलिस निरिक्षकाच्या पत्रानंतर पुण्यातील सुजाता कॉम्प्युटर या कंपनीचे अभियंता अरुण पाटील हे अकोट पोलिस स्टेशनमध्ये आले होते. त्यांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात बिघाड असल्याचा खुलासा केला. त्यामुळे पोलिसांच्या परवानगीने त्यांनी डीव्हीआर काढून घेवून गेले. डीव्हीआर तपासल्यानंतर त्यांनी मागील सहा महिन्यापासून कोणतेही रेकॉर्डींग झालं नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर त्यांनी डीव्हीआर पोलिसांकडे सुपूर्द करायला पाहिजे होता. मात्र त्यांनी तसं केलं नाही. सीआयडीने या दृष्टीने सुद्धा तपास करणे गरजेचे असल्याचे मत खात्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

पोलिस स्टेशनमधील इतर सर्व कॅमेरे चालू असताना नेमका हाच कॅमेरा बंद का होता याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. शिवाय काढून नेलेल्या डीव्हीआरमध्ये नक्कीच 15,16,17 जानेवारीला घडलेल्या घटनांची नोंद असण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी सदर डीव्हीआर जाणीवपूर्वक काढून घ्यायला लावल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर 18 तारखेच्या दरम्यान पोलिस निरिक्षकांकडून एसपींना पत्रव्यवहार करण्यात आला. हा सर्व प्रकार संशयास्पद असून पुरावे नष्ट करण्यासाठी तर हे सर्व केलं नाही ना? अशा चर्चा पोलिस वर्तुळात सुरु आहेत.

गोवर्धनच्या मृत्यूप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर हा तपास पोलिस उपनिरिक्षक विष्णू बोडखे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र तपासात दिरंगाई केल्याच्या कारणारवरून त्यांची बदली पोलिस मुख्यालयात करण्यात आली आहे. सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले असल्याची माहीती पोलिस निरिक्षक संतोष जुनघरे यांनी सांगितलं. त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT