Amravati Lok Sabha Election 2024 Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : उघड पंगे घेणे पडणार महागात; नवनीत राणांना सामूहिक विरोध

प्रसन्न जकाते

Lok Sabha Election 2024 : एकाच गावात राहत सर्वच नेत्यांशी पंगा घेणे विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा, बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना चांगलाच महागात पडणार आहे. शिवसेना, भाजप, प्रहार जनशक्ती पार्टी यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी राणा यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अनेकांनी तर राणा यांना भाजपमध्ये घेण्यात येऊ नये व अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येऊ नये, असे लेखी स्वरूपात दिल्याने युवा स्वाभिमान पार्टीच्या नवनीत राणा, रवी राणा यांनी आवळलेली ‘मूठ’ विरोधक पूर्णपणे सैल पाडण्याची दाट शक्यता आहे. यापलीकडेही भाजपने राणा यांचा प्रवेश करून घेतला व त्यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह महायुतीमधील सर्वच पक्षाचे नेतेही जमके काम करणार आहेत.

नवनीत राणा या महायुतीच्या उमदेवार असतील, असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यानंतर लगेचच रवी राणा यांनी अमरावतीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा घेतला होता. या मेळाव्याला अनेक नेत्यांनी दांडी मारली. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांनीही राणा यांना द्यायचा तो इशारा देऊन टाकला. आता तर भाजपच्या पक्ष निरीक्षकांपुढेच सर्वपक्षीय विरोध व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राणा यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पराभवाचा धक्का सहन करावा लागणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या बैठकीनंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ, त्यांचे सुपुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांना महायुतीमधील सर्वच पक्षांचा विरोध असल्याचे जाहीर केले. अडसूळ पितापुत्रासह राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी आमदार प्रवीण पोटे, आमदार बच्चू कडू, माजी आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांचे राणा दाम्पत्याशी सख्य आहे असे नाही. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके यांचेही राणांशी जुळत नाही. त्यामुळे बोटावर मोजण्याएवढे काही नेते सोडल्यास राणा दाम्पत्याचे ‘पुरे गाव से बैर’ अशी स्थिती आहे. त्यामुळे भाजपने त्यांना प्रवेश करून घेत उमेदवारी दिली तरी राणा यांच्या पराभवासाठी संपूर्ण जिल्हाभरात सुरुंग पेरले जाणार हे निश्चित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिल्यानंतरही त्यांना प्रचंड विरोध झाला होता. अमरावतीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यावेळी संजय खोडके यांना काढण्यात आले होते. कालांतराने पुन्हा खोडके यांची घरवापसी झाली. आता एकाच वेळी सत्ताधारी व विरोधक असे अख्खे गाव विरोधात उतरल्याने राणांची अवस्था ‘जाए तो जाए कहाँ’ अशी झाली आहे. राणा यांना भाजपमधून देवेंद्र फडणवीस मदत करतात हे सर्वश्रुत आहे, परंतु मुंबई-दिल्लीतील नेते कामात येणार नाहीत. ‘गाववालो’चीच मदत घ्यावी लागणार हे लक्षात ठेवावे, असा गर्भित इशारा माजी आमदार प्रवीण पोटे यापूर्वीच राणा यांना भर सभेत देऊन मोकळे झाले आहेत.

राणा यांनी कितीही प्रचार केला कितीही ‘रसद’ पुरविली तरी जेवढी ताकद आणि पैसा राणा जिंकण्यासाठी खर्च करू शकणार नाही, तेवढा खर्च आणि ताकद त्यांचे विरोध त्यांचा पराभव करण्यासाठी लावण्याची तयारी करीत आहेत. सत्तापक्ष आणि विरोधक दोघांनीही यासाठी आपल्या तिजोऱ्या खुल्या करण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचा ‘अमरावती टू दिल्ली’ हा प्रवास यंदा चांगलाच खडतर ठरणार आहे. अशात राणा दाम्पत्य यंदा केंद्रात एखादे राज्यमंत्री पद मिळण्याची आस लाऊन आहेत. लोकसभेनंतर हाच प्रयत्न रवी राणा यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत करायचा असे साऱ्यांनीच ठरविले आहे. अशात राणा यांच्या विरोधात सुरू असलेल्या याचिकेचा निकाल त्यांच्या विरोधात लागल्यास काय होणार हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. सुरुवातीपासून महायुतीत शिवसेनेला सुटणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर आजही मावळ्यांचा दावा कायम आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT