Amravati LokSabha constituency : चंदेरी दुनियेतून राजकारणात आलेल्या नवनीत राणा यांचे ग्रह यंदाही चमकणार?

Amravati Political News : तडकफडक संभाषण, आक्रमक भूमिका, भावनिक, प्रसंगी पाणावणारे डोळे यामुळे नवनीत राणा नेहमीच चर्चेत असतात.
Navneet Rana
Navneet Ranasarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 :  खासदार नवनीत रवी राणा हे नाव माहिती नाही, असे कदाचितच एखादा सापडेल. चित्रपटांमधून टीव्हीवर दिसणाऱ्या नवनीत राणा यांच्या जीवनातील ‘‌ग्लॅमर’ आजही कायम आहे. फरक तो एवढाच, की पूर्वी त्या चित्रपटातून टीव्हीवर दिसायच्या आणि आता राजकीय व्यासपीठावरून. योगगुरू रामदेवबाबा यांच्या सान्निध्यात असताना त्या वडनेराचे आमदार रवी राणा यांच्या संपर्कात आल्या. दोघांमध्ये मैत्री झाली व ही मैत्री कालांतराने विवाहात रुपांतरित झाली. रवी राणा यांनी नवनीत कौर यांच्याशी विवाहबद्ध होताना अमरावती शहरात मेगा सामूहिक विवाह सोहळ्याचे ‘‌न भूतो न भविष्यती’ असे आयोजन केले होते. रवी राणा यांच्याशी विवाह झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटक्षेत्रातून राजकीय पडद्यावर पदार्पण केले.

पतीसोबत त्यांनी अमरावतीचा कानाकोपरा पालथा घातला. पत्नीला खासदार करायचे, हे रवी राणा यांनी विवाहाच्या दिवशीच ठरवले होते. अमरावतीचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या चित्रपटातील भूमिकांवरून केलेल्या टीकेमुळे नवनीत राणा यांच्या डोळ्यांत त्यावेळी तरळलेल्या अश्रूंनी अमरावतीमधील अनेकांचे मतपरिवर्तन केले. परंतु पहिल्याच झटक्यात त्यांना यश मिळाले नाही. अडसूळ यांनी नवनीत राणा यांना ‘दिल्ली अभी दूर है...’ हे दाखवून दिले होते.

Navneet Rana
Chandrashekhar Bawankule : लोकसभेसाठी महायुतीचा पहिला उमेदवार ठरला, बावनकुळेंनी 'या' नावाची केली घोषणा

लोकसभेच्या त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र राणा यांनी अशी व्यूहरचना केली, की अडसूळ पराभूत झाले. तडकफडक भाषण, आक्रमक भूमिका, भावनिक, प्रसंगी पाणावणारे डोळे यामुळे नवनीत राणा नेहमीच चर्चेत असतात. अमरावतीमध्ये लव्ह जिहादचे एक कथित प्रकरण त्यांच्यावर बूमरँग झाले होते. या प्रकरणातील कथित युवती ही कुटुंबातील वादानंतर स्वत:च घरातून निघून गेली होती. मात्र राणा यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा दावा करीत राजापेठ पोलिस ठाण्यात चांगलाच गोंधळ घातला होता. या प्रकरणातील तरुणीने सत्यकथन करीत राणा यांनी आपली बदनामी केल्याचा खुलासा प्रसारमाध्यमांपुढे केला होता.

अमरावतीच्या तत्कालीन पोलिस आयुक्त आरती सिंह, अचलपूरचे आमदार तथा प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू, तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्याशी राणा यांचे फारसे सख्य नाही. राणा आणि वाद एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेही त्यामुळे म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने व काँग्रेसच्या पाठिंब्याने विजयी झालेल्या राणा सध्या भाजपच्या खूपच जवळ गेल्या आहेत.

Navneet Rana
Amravati : भाजपच्या नेत्याने अगदी ठासून सांगितले, बच्चू कडू कुठेही जाणार नाहीत

राणा दाम्पत्य दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्रनामाचा सतत जप करीत असतात. केंद्रात नवनीत राणा यांना किमान एखादे राज्यमंत्रिपद मिळावे, यासाठी आमदार रवी राणा प्रयत्न करीत असल्याचे नेहमीच सांगण्यात येते. 2024 मधील निवडणुकीत नवनीत राणा या महायुतीसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. आगामी निवडणुकीत विजयी झाल्यास राणा यांच्या कुंडलीतील ग्रह त्यांना मंत्रिपदाचा राजयोग मिळवून देतील काय, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

नाव (Name)

नवनीत रवी राणा

जन्मतारीख (Birth date)

6 एप्रिल 1985

शिक्षण (Education)

बारावी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे गेल्या तीन टर्मपासून बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. राणा यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांचे एकत्र कुटुंब असून रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा व त्यांच्या पत्नी, दोन मुले व आई-वडील त्यांच्यासोबत राहतात.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

नवनीत राणा पूर्वी चित्रपटांमध्ये काम करीत होत्या. रवी राणा यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांचा खासगी व्यवसायही आहे.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

अमरावती

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

नवनीत राणा या अपक्ष खासदार आहेत. त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. त्याच्या त्या पदाधिकारी आहेत.

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

2014 मध्ये नवनीत राणा यांनी आपली पहिली निवडणूक अमरावती लोकसभा मदतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून व काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढविली. नवनीत राणा यांना 3 लाख 29 हजार 280 मते मिळाली. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 67 हजार 12 मते मिळाली होती. 1 लाख 37 हजार 932 मतांनी अडसूळ यांनी राणा यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणा यांनी पुन्हा निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. राणा यांना 5 लाख 10 हजार 947 मते मिळाली. आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 73 हजार 996 मते मिळाली. नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार 951 मतांनी पराभव केला. त्याच काळात आनंद अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा पुढे केला. न्यायालयात याचिकाही दाखल केली. त्यानंतर अडसूळ व राणा यांच्यातील वाद पेटला.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

खासदार राणा यांनी राजकारणामध्ये प्रवेशनानंतर महिलांसाठी रोजगार मेळावे घेतले. युवा स्वाभिमान पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त त्या दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करतात. आपले संपूर्ण वर्षाचे वेतन त्या दिव्यांग, अनाथ व शहीद कुटुंबांना देतात. मेळघाटमधील तरुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी त्यांनी क्रीडासाहित्यवाटप केले. शिवकथाकार प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे त्यांनी नुकतेच आयोजन केले होते.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 मधील निवडणुकीत नवनीत राणा विजयी झाल्या, त्यावेळी अमरावतीत आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात संतापाची लाट होती. मुस्लिम मतदारांमध्ये भाजपसह आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल तीव्र नाराजी होती. अनुसूचित जातीचे मतदारही अडसूळ यांच्याविरोधात होते. घरोघरी जात राणा यांनी त्यावेळी प्रचार केला होता. निवडणुकीपूर्वी त्यांनी मेळघाटात पाळेमुळे घट्ट रोवली. खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र आमदार अभिजित अडसूळ अमरावतीत कमी व मुंबईत जास्त मुक्कामी असायचे, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरला होता.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघातील जनसंपर्क दांडगा आहे. मतदारसंघातील जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची हजेरी असते. सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजन त्या नियमित करतात. गरबा, गौरी-गणपती, रक्षाबंधन, दिवाळी अशा प्रसंगी राणा दाम्पत्य मतदारसंघात किराणा साहित्याच्या किट्सचेही वितरण करतात. त्यांच्या घरी दररोज शेकडो लोक विविध समस्या घेऊन येत. जास्तीत जास्त वेळ अमरावती येथे मुक्कामी राहत खासदार राणा जनतेच्या संपर्कात असतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

खासदार नवनीत राणा यांचा सोशल मीडिया अतिशय प्रभावी आहे. त्या स्वतः चित्रपटसृष्टीतील असल्याने त्यांचे अनेक फॉलोअर्स फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर आहेत. सोशल मीडियासाठी त्यांची खास टीमच आहे. दररोज ते वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स, भाषणाचे व्हिडीओ, फोटो आदी पोस्ट करीत असतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना 14 दिवस तुरुंगवासात राहावे लागले होते. राणा सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करतात. अलीकडेच त्यांनी ठाकरेंना हनुमान चालिसा पठण रोखून दाखवा, असे जाहीर आव्हान दिले होते. याशिवाय नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यावर लोकसभा निवडणुकीत आपल्याकडून पैसे घेत दुसऱ्याचे काम केल्याचा आरोप केला होता.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

कुणीही नाही.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

नवनीत राणा खासदार झाल्यानंतर त्यांनी मेळघाटमध्ये स्कायवॉक व्हावे, यासाठी प्रयत्न केले. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे व देशातील पहिल्या क्रमांकाचे स्कायवॉक त्यांच्या मतदारसंघातील मेळघाटाती चिखलदरा येथे होत आहे. अमरावतीत रेल्वे वॅगन कारखान्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. टेक्स्टाईल पार्कसाठी त्या प्रयत्नशील आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

खासदार नवनीत राणा यांना 2019 मध्ये मुस्लिम व दलित समुदायाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. निवडून आल्यानंतर मात्र त्या भाजपसोबत गेल्या. त्यांचे पती आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्यावर राजकारणातील संधीसाधू असल्याचा आरोप नेहमीच होतो. अलीकडे त्यांनी हिंदुत्वाची कास धरली आहे. संघ व भाजपशी अचानक त्यांनी साधलेली अमरावतीमधील मुस्लिम व दलित मतदारांना आवडलेली नाही.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

खासदार नवनीत राणा या सध्या महायुतीत आहेत.अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या जागेवर त्या निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत केली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी आता निश्चित मानली जात आहे. राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील की अपक्ष लढत पाठिंबा घेतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com