Amol Mitkar Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari News : भाजप-पवार गटाचे जमता जमेना; ‘हा’ भाजपचा प्रचार मेळावा आहे का, म्हणत संतापले मिटकरी !

जयेश विनायकराव गावंडे

Akola District Political News : विविध कार्यक्रमांसाठी येत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार व पदाधिकाऱ्यांचे फोटो नसल्याने आमदार अमोल मिटकरी यांनी हा भाजपचा प्रचाराचा कार्यक्रम आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Consensus of Ajit Pawar and Uddhav Thackeray group on this issue)

दरम्यान, लावण्यात आलेल्या बॅनरवर केवळ भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांचेच फोटो लावण्यात आले आहेत. ही जाहिरात सरकारी खर्चातून करण्यात आली असेल तर याची चौकशी करावी लागेल, असे म्हणत तशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अकोल्यात आज आरोग्य विभागाच्या विविध रुग्णालयांच्या लोकार्पण कार्यक्रमांसह आयोजित केलेला दोनदिवसीय आरोग्य महामेळावा होत आहे.

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोल्यात आहेत. मात्र, याच आरोग्य महामेळाव्यावरून राज्यातील सत्ताधारी महायुतीतच मतभेद उफाळून आले आहेत. आमदार मिटकरींनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आरोग्य विभागाच्या कार्यक्रमासाठी अकोला शहर आणि जिल्हाभरात पोस्टर तसेच बॅनर्स लागले आहेत. यावर कोणत्याही वैधानिक पदावर नसलेल्या भाजप नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो लागलेले आहेत. दरम्यान, सत्ताधारी अजित पवार गटासोबतच विरोधी शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही या प्रकाराला विरोध केला आहे.

काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी?

जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये सहभागी असेल तर जिल्ह्यातील भाजप नेत्यांना याचे ज्ञान नाही का? कारण 'या' बॅनरवर महाराष्ट्र शासनाचा 'सिम्बॉल' आहे. माजी महापौर यांच्या फोटोसह अन्य सदस्यांचे फोटो लावत असाल आणि भाजपचे बॅनर असेल तर आमचे म्हणणे नाही. परंतु सरकारी खर्चातून ही होर्डिंग्जबाजी आहेत का? याची माहिती पालकमंत्र्यांनी घ्यावी.

आम्ही सत्तेतील घटक पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदाराचा फोटो या होर्डिंग्जवर नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आमदार मिटकरी यांनी खेद व्यक्त केला आहे. यासंदर्भात मी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी दोषी असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे.

आमदार नितीन देशमुखांचा कार्यक्रमावर बहिष्कार...

सरकारच्या पैशांची भाजपने स्वत:च्या प्रचारासाठी उधळपट्टी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केला. हा कार्यक्रम म्हणजे भाजपची प्रचार सभाच आहे. त्यामुळे आपण कार्यक्रमाला जाणार नसल्याचं आमदार नितीन देशमुखांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना केलं स्थानबद्ध...

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आज उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होताच. पोलिसांकडून ठाकरे गटाच्या ५० कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. शहरप्रमुख राजेश मिश्रांचा समावेशदेखील त्यामध्ये आहे, तर जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये आमदार नितीन देशमुख हजर झाले होते. भाजपने स्वतः खर्च करून शहरात आणि जिल्ह्यात होर्डिंग्ज लावले असल्याचे भाजपचे प्रसिद्धिप्रमुख गिरीश जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT