BJP Politics sarkarnama
विदर्भ

BJP Politics : प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाने भाजपमध्ये मोठा गोंधळ! शहराध्यक्षपदावरून नवा वाद? दोन नितीन आमनेसामने

Amravati BJP City President Appointment Controversy : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमरावती शहर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

Amravati News : अमरावतीत भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद चांगलेच चव्हाट्यावर आले असून शहर जिल्हा भाजप अध्यक्ष कोण? असा प्रश्न कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. डॉ. नितीन धांडे यांना हटवून नितीन गुडधे यांची नियुक्ती करण्यात आली असतानाच या नियुक्तीला चोवीस तासांत स्थगिती देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पातळीवर हा निर्णय स्पष्ट झालेला नसल्याने दोन्ही नितीनचे भविष्य अधांतरी लटकले आहे.

भाजपने जिल्ह्यात शहर जिल्हाध्यक्षांसह ग्रामीणसाठी दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले होते. दरम्यान झालेल्या महापालिका व विधान परिषद निवडणुकीनंतर करण्यात आलेल्या फेरबदलात डॉ. नितीन धांडे आणि रविराज देशमुख यांना हटविण्यात आले. त्यांच्या जागी नितीन गुडधे यांची शहर जिल्हाध्यक्ष, तर आमदार प्रताप अडसड यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

मात्र नियुक्तीचा हा आनंद गुडधे यांच्यासाठी फार काळ टिकला नाही. चोवीस तासांतच फिरलेल्या राजकीय खेळीत त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. प्रदेशाध्यक्षांनीच स्थगितीचे आदेश दिले असल्याने ते उठविण्याचे अधिकारही त्यांचेच आहेत. अद्याप त्यांनी यावर काहीच निर्णय घेतलेला नाही.

यामुळे डॉ. धांडे पदावर कायम असल्याचा दावा त्यांचे समर्थक करू लागले आहेत. तर, नव्या नियुक्तीला स्थगिती आहे, ते रद्द करण्यात आलेले नसल्याने नितीन गुडधे हेच शहर जिल्हाध्यक्ष आहेत, असा दावा गुडधे यांचे समर्थक करीत आहेत. तर नेमके या पदावर आहेत तरी कोण? हे मात्र स्पष्ट होत नसल्याने भाजपच्या अंतर्गत वर्तुळासह राजकीय क्षेत्रात संभ्रमाची स्थिती कायम आहे.

गुडधे हे आमदार राजेश वानखडे यांच्या गटातील आहेत. त्यांना खासदार डॉ. अनिल बोंडे यांचेही समर्थन आहे. तर, माजी खासदार नवनीत राणा यांचा या नियुक्तीस तीव्र विरोध असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांच्या पातळीवरून या नियुक्तीसंदर्भात स्पष्टता येत नाही तोवर दोन्ही नितीन यांचे राजकीय भविष्य अधांतरी असल्याचे बोलल्या जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT