Amravati Graduate Election : Dheeraj Lingade Sarkarnama
विदर्भ

Amravati Graduate Election : या 'पाच' कारणांमुळे नवख्या धीरज लिंगाडेंना विजय साकारता आला!

Dheeraj Lingade : भाजपची गटबाजी लिंगाडेंच्या पथ्यावर!

Chetan Zadpe

Amravati Graduate Election : अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) आणि भाजप उमेदवार ऱणजित पाटील यांच्यात थेट लढत झाली. तब्बल २८ तासांपासून याठिकाणी मतमोजणी सुरू होती. मतमोजणी दरम्यान राजकीय नाट्य दिसून आले. अखेर या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यात भाजपच्या रणजित पाटील यांना पराभव झाला असून, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांचा विजय झाला आहे.

अमरावतीची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला गेल्याने धीरज लिंगाडे हे ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटातून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. दरम्यान,लिंगाडे यांची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये त्यांनी उमेदवारी दिलेल्या आपल्याच काँग्रेस पक्षाची बदनामी केल्याचा दावा केला जात होता. याचा फटका लिंगाडेंना बसणार असल्याचे बोलेले जात होते. मात्र यानंतरही लिंगाडेंचा विजय खेचून आणला. त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरलेले काही प्रमुख कारणे आहेत.

धीरज लिंगाडे यांच्या विजयात हे पाच घटक महत्त्वपूर्ण ठरले..

१) महाविकास आघाडीची एकीची लढत :

निवडणूक जाहीर झाली तेव्हा ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे असणार हे स्पष्ट झाले होते. मात्र भाजपचा तगडा व मंत्री राहिलेले रणजीत पाटील यांच्या विरोधात काँग्रेसला मजबूत उमेदवार मिळत नव्हता. शिवसेना ठाकरे गटात असलेले धीरज लिंगाडे यांना ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. यामुळे महाविकास आघाडीने एकत्रित येत, कोणतेही अंतर्गत मतभेद न ठेवता भाजपच्या बोलेकिल्ल्यात लढत दिली. तिन्ही पक्ष व इतर मित्रपक्षांची एकत्रित लढाई दिल्याने, भाजपच्या मंत्री राहिलेल्या उमेदवाराचा पाडाव करून इथे विजय साकारता आला.

२) भाजपची अंतर्गत नाराजी :

रणजीत पाटील या निवडणुकीत पडू शकतात, असे भाजपचे काही नेते खासगीत बोलत होते. तेव्हाच त्यांच्या बोलण्यातील अर्थ अनेकांना कळला होता. यानंतर ही पाटील यांनी लक्ष दिले नाही. अकोल्यातील एका गटाचा विरोध म्हटला, तर तो गेल्या दोन निवडणुकांमध्येही होता. पण तरीही ते दोन टर्म वेळा निवडून आले होते. मात्र यावेळीत्यांनी भाजपमधील ‘त्या’ गटासोबतच इतरही अनेक जण नाराज होते.पाच जिल्ह्यांतील आमदारांनी पाटलांसाठी काम केले नसल्याचेही सांगण्यात येते. ही गोष्ट पटण्यासारखी आहे. कारण काही आमदार त्यांच्या प्रचारात दिसलेच नाहीत, असे स्थानिक कार्यकर्ते सांगतात.

३ ) अँन्टी इन्कबन्सीची फटका :

भाजपचे उमेदवार हे मागील दोन टर्म आमदार होते. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ते राज्यमंत्री म्हणून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होता. फडणवीसांचे ते निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. एवढ्या जमेच्या बाजू असतानाही, पाटील यांना अँन्टी इन्कबन्सीची फटका बसला. दोन वेळा आमदार आणि मंत्री राहूनसुद्धा मतदारसंघासाठी विशेष काही कामगिरी करता आली नाही. ठळकपणे काम सांगता येतील असे काही त्यांना दाखवता येत नव्हते. यामुळे त्यांना या निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जात आहे.

४) भाजपची शिस्त, संघटनचा अभाव :

भाजप पक्ष म्हणजे केडरचा पक्ष म्हणून ओळखला जातो. प्रत्येक निवडणुकीत भाजपचे केडर दिसून येत आहे. मात्र विदर्भाचा भाग असूनही, या निवडणुकीत केडर संघटीत कार्याचा अभाव दिसला. मागील दोन टर्ममध्ये रणजीत पाटील यांनी मतदारसंघात काम केले नाही, असेच भाजपचे (BJP) नेते, कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

यामुळेच ते या निवडणुकीपासून स्वतःला राहिले.यामुळेच नवख्या लिंगाडे यांचा विजय सुकर झाला. नाहीतर केवळ १५ दिवसांपूर्वी उमेदवारी घोषित झालेले लिंगाडे जिंकू शकले नसते. लिंगाडेंचा विजय म्हणजे रणजीत पाटलांवरची नाराजी आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

५) भाजपमधील गटबाजी :

रणजीत पाटील यांनी सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अमरावती आणि या जिल्ह्याकडे त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यांच्या पराभवामागील हे एक मोठे कारण आहे. प्रत्यक्ष दिसत नसली तरी भाजपमध्ये गटबाजी आहे. रणजीत पाटलांचे भाजपमधील एका मोठ्या गटासोबत (अकोला) पटत नाही. या गटाचे नेते भाजपमधील मोठे प्रस्थ आहे. त्या गटासोबत जुळवून न घेणे, याचा फटका त्यांना बसला. पाटलांचा विरोधी गट केवळ तटस्थ राहिला असे नाही, तर त्या गटाने पाटलांच्या विरोधात काम केले. त्याशिवाय लिंगाडेंचा विजय शक्य नव्हते.

या प्रमुख कारणांमुळे नवख्या धीरज लिंगाडे यांना भाजपच्या तगड्या उमेदवाराला नमवून अत्यंत अटीतटीच्या लढतीत, लिंगाडेंना विजय मिळवता आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT