MIM Amravati News: महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण हे बेभरवशाचं राजकारण झालं आहे. कुठला राजकीय नेता कुणाचं बोट धरुन कुठे केव्हा निघून जाईल काही नेम नाही. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवड हा प्रकारही पाहायला मिळाला. एकमेकांच्या राजकीय विचारधारांवरुन एकमेकांवर तुटून पडणाऱ्या पक्षांचं देखील मनोमिलन झालेलं पाहायला मिळालं. त्यातच आता एका महापालिकेत भाजपचा महापौर व्हावा यासाठी एमआयएमच्या नगरसेवकानं पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे. यामुळं अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अमरावती महापालिकेत हा प्रकार घडला असून इथं महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड झाली तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड झाली आहे. पण या निवडणुकीदरम्यान चक्क भाजपचा कट्टर राजकीय विरोधक असलेल्या एमआयएमच्या नगरसेवकानं महापौर आणि उपमहापौर या दोन्हींसाठी मतदान केलं. आवाजी मतदान पद्धतीनं ही निवडणूक पार पडली. यावेळी एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या महापौरपदासाठी हात वर करुन सर्वांसमोर आपलं समर्थन जाहीर केलं. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत 25 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला 15 जागांवर यश मिळाले होते. याशिवाय काँग्रेसला 15, एमआयएम 12, राष्ट्रवादी 11, शिवसेना 3, बसपा 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 आणि वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला होता. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. पण महापौरपदाच्या निवडणुकीत नगरसेविका मीरा कांबळे यांच्यामुळं एमआयएमचं एक मत फुटलं तर शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मतदान केलं.
एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांना भाजपच्या उमेदवारांना मतदान करणं महागात पडलं असून पक्षानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळं आता या नगरसेविकेवर काय कारवाई होते ते पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.