

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काठावरचे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विरोधी पक्षांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवक पद येत आहेत. त्यामध्ये तीनपैकी एक नगरसेवकपद मनसेला सोडण्यात यावे, असा आग्रह मनसेच्या नेत्यांनी धरला असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक लढवत असताना उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला अधिकाधिक जागा देऊन अगदी मोजक्या जागांवर मनसेने निवडणूक लढवली. त्यावेळी कुठलाही आग्रह मनसेने केला नाही किंवा जागा वाटपाच्यावेळी पेच निर्माण केला नाही. त्यामुळे आता तरी ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येत असलेल्या तीन स्वीकृत नगरसेवकापैकी एक स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेसाठी सोडावी, अशी मोठी मागणी मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मनसे पक्षाला सत्ताधारी पक्षांचासुद्धा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत विविध पदावर निवडून आलेले सहा नगरसेवकांना संधी मिळावी, त्यासोबतच स्वीकृत नगरसेवक मिळावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अन्यथा इतर प्रस्तावांचा सुद्धा विचार केला जावा, असेही मत मनसेच्या बैठकीत मांडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
त्यामुळे येत्या काळात ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आपल्या तीन स्वीकृत नगरसेवकापैकी एक स्वीकृत नगरसेवकांचे पद मनसेला देणार का? आणि तिन्हीही स्वीकृत नगरसेवक ठाकरे यांच्या शिवसेनेने दिले तर मनसे काही वेगळी भूमिका घेणार का? हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पहिल्यांदाच तब्बल 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपाकडे सर्वाधिक 89 नगरसेवक आहेत. त्यामुळे दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी किमान चार सदस्य भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता असून, एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच काँग्रेसलादेखील एक-एक स्वीकृत नगरसेवक पद मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.