kiran saranik, shrikant deshpande sarkarnama
विदर्भ

Amravati teacher constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघ: श्रीकांत देशपांडे पुन्हा मैदानात; पक्षाचे नाव ठरताच विरोधकांचे धाबे दणाणले!

Amravati teacher constituency News : 2020 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता.

Sachin Waghmare

Amravati News : अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे. डिसेंबर 2026 मध्ये या मतदारसंघातील आमदारांची मुदत संपणार आहे. या जागेसाठी महायुतीमधील मित्रपक्ष व महाविकास आघाडीतील मित्रपक्ष निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. 2020 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता ही निवडणूक लढविण्याची तयारी शिक्षक आघाडीचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे. या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.

माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अमरावती शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेत शनिवारी जाहीर केली. शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, यावेळी त्यांनी आपला जाहीरनामाही प्रसिद्ध केला.

2020 च्या विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले किरण सरनाईक यांनी यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची उमेदवारी सरनाईक यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीकांत देशपांडे यांनी देखील शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

श्रीकांत देशपांडे हे पूर्वीपासूनच शिवसेनेसोबत जुळलेले असून त्यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. गेली निवडणूक त्यांनी शिक्षक आघाडीच्या बॅनरखाली लढवून विजय मिळविला होता. अमरावती शिक्षक मतदारसंघातुन त्यांनी 2020 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवारी मिळाली होती. यावेळी श्रीकांत देशपांडे यांना अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी 2008 मध्ये शिक्षक आघाडीची स्थापना करून शिक्षकांच्या प्रश्‍नांसंदर्भात लढा सुरू केला. जून 2014 मध्ये ते शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांची ही दुसरी निवडणूक होती. 1996 ते 1999 या कालावधीत ते महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष होते, तर 1999 ते 2005 पर्यंत ते शिवसेनेचे विदर्भ विभाग संपर्कप्रमुख होते.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य, राज्य विशेषाधिकार समितीचे सदस्य, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य विधानपरिषद सदस्य (राज्यमंत्री दर्जा), अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून सुरु केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT