Kiran Sarnaik Sarkarnama
विदर्भ

Amravati Teachers Election Result : बंडखोरांच्या गर्दीतही शिंदेंच्या शिलेदाराने पहिल्या फेरीतच घेतली मोठी आघाडी...

Shiv Sena's Kiran Sarnaik Lead In Vote Counting : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक पहिल्या फेरीत १५०० मतांनी आघाडीवर आहेत. बंडखोरीनंतरही त्यांनी मोठी आघाडी घेतली असून नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांतही महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

Vijaykumar Dudhale

Amravati , 27 October : विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सध्या सुरू आहे. या मतमोजणीत पदवीधरच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी पहिल्या फेरीतच तब्बल १५०० मतांनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या स्थानावर शिवसेनेचे बंडखोर उमेदवारच आहेत. याशिवाय भाजप नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती, त्यानंतरही शिंदेंच्या शिलेदाराने मोठी आघाडी घेतली आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्तात्रेय लहाने, बंडखोर श्रीकांत देशपांडे हे नशीब अजमावत आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालात महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत शिवसेनेचे किरण सरनाईक यांना ३,८०० मते मिळाली आहेत. त्यांना तब्बल १,५०० मतांची आघाडी मिळाली आहे. भरभक्कम मिळालेली आघाडी पाहून आमदार सरनाईक हे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत.

पहिल्या फेरीतील १४ हजार मतांची मोजणी झाली आहे. या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना ३ हजार ८०० मते मिळाली आहेत. ते १ हजार ५०० मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना २ हजार २०० मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे याही पिछाडीवर गेल्या आहेत

विशेष म्हणजे अमरावती शिक्षक मतदारसंघात राज्यसभा खासदाराच्या बहिणीने बंडखोरी केली होती, त्यानंतर एका बड्या उमेदवाराने आपण चंद्रशेखर बावनकुळे यांचे खंदे समर्थक असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना उमेदवारला भाजपच्या बंडखोरांनी घेरले होते. यशिवाय शिवसेनेच्या एका व्यक्तीने बंडखोरी केली होती, त्यामुळे बंडखोरांच्या भाऊगर्दीत किरण सरनाईक हे आपली सत्ता राखण्याची चिन्हे दिसून येत आहे.

नागपूरमध्ये भाजपचे कोहळे आघाडीवर

दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघातून पोस्टल मतदानात सुरुवातीला काँग्रेसचे अभिजीत वंजारी हे आघाडीवर होते. मात्र, त्यानंतर वंजारी यांची आघाडी तोडून भाजपचे सुधाकर कोहळे यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात कोहळे यांनी मताधिक्क्य मिळविले आहे.

संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाणांना 37 मतांची आघाडी

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांच्यात काँटे की टक्कर दिसून येत आहे. पहिल्यांदा पाटील आघाडीवर होते. मात्र, मतमोजणी पुढे सरकत असताना आमदार चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. पोस्टलच्या 300 मतांची मोजणी झाली आहे, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांना 137, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील 100, तर दिलीप घुगे - 31, रविराज साबळे - 19 मते पडली आहेत. सतीश चव्हाण हे 37 मतांनी आघाडीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT