Anil Deshmukh and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष ओबीसी होते, फडणवीसांकडे चुकीची माहिती !

सरकारनामा ब्यूरो

Anil Deshmukh on NCP's State President : राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष ओबीसी असावा, अशी सूचना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. तेव्हापासून हा विषय चर्चेत आला. (Ajit Pawar expressed his desire to become the state president of NCP)

ओबीसी प्रदेशाध्यक्ष नेमण्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनीही राष्ट्रवादीला टारगेट करणे सुरू केले. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा समाचार घेतला. राष्ट्रवादी ओबीसी विरोधी असल्याचा आरोप होऊ लागला.

यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांना विचारणा केली असता, प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा बाळगणे काही गैर नाही. पक्षात काम करणाऱ्यांना तसे वाट शकते. त्यावरून इतरांनी टिका करण्याचे काही एक कारण नाही, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी ओबीसी विरोधी असल्याच्या आरोपाबाबत ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची माहिती चुकीची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पहिला प्रदेशाध्यक्ष हा ओबीसी होता. सन १९९९मध्ये जेव्हा पक्षाची स्थापना झाली, तेव्हा शरद पवारांनी छगन भुजबळ यांच्या रूपाने पहिला ओबीसी प्रदेशाध्यक्ष दिला.

१९९९ नंतर पक्षात अनेक स्थित्यंतरे आली. तेव्हापासून आजतागायत कितीतरी ओबीसी चेहऱ्यांना पक्षाने संधी दिलेली आहे. ओबीसी आमदार, खासदार आणि मंत्रीही झाले. त्यामुळे राष्ट्रवादी ओबीसीविरोधी असल्याच्या विरोधकांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असेही आमदार देशमुख म्हणाले.

शरद पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले, ते तत्त्वांसाठी. आमच्या ५० आमदारांसारखे ५० खोके घेऊन ते बाहेर पडले नव्हते. आताच्या ५० आमदारांनी ५०-५० खोक्यांसाठी गद्दारी केली. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडी नाराजी कुणीही दाखविणारच आहे. त्यासाठी आमदारांनी विविध कारणे दिली. कारण तेव्हा ५० खोक्यांचे वजन मोठे होते.

ओबीसीचे (OBC) तारणहार असल्याचे दावे करणाऱ्यांनी दिलेले वचन तरी पाळले का, असा सवाल देशमुखांनी केला. ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधू, असे त्यांनी म्हटले होते. पण ते केले नाही. या सरकारच्या (State Government) काळात ओबीसींवर अन्याय वाढले आहेत. त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. त्यामुळे त्यांना ओबीसींवर बोलण्याचा अधिकार नाही, असे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT