Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh On Jalna Andolan: मी गृहमंत्री राहिलेलो आहे; काही माहिती मलाही मिळते, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट !

Atul Mehere

Nagpur Political News : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात उपोषणकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर आंदोलन चिघळले आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशात माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (The order for this baton charge was given by the Ministry of Home Affairs)

आज (ता. ४) नागपुरात पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, जालन्यात अमानुषपणे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. ही दुर्दैवी घटना आहे. या लाठीचार्जचा आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आला. त्यानंतर हा लाठीचार्ज झाला. मराठा समाज एकत्र येत आहे, हे पाहून अधीक्षकांना बळीचा बकरा बनवून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. पण येवढ्याने काहीही होणार नाही.

निवृत्त न्यायाधीशांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी केली पाहिजे. त्यानंतरच माझ्या बोलण्यात किती तथ्य आहे, हे समोर येईल. कारण मी स्वतः गृहमंत्री राहिलेलो आहे. त्यामुळे काही माहिती आम्हालाही मिळत असते. गृहमंत्रालयाकडून आदेश दिल्या गेल्याशिवाय अशा कारवाया होत नाहीत. असे म्हणत अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) नाव न घेता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) तोफ डागली.

आंतरवाली सराटी येथील घटना झाल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. नुसती चिखलफेक सुरू आहे. तसेच शरद पवार, (Sharad Pawar) उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार उदयनराजे, माजी खासदार संभाजीराजे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत सरकारवर आगपाखड केली होती.. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली.

दर वेळी सरकारच्या संकटकाळात धावून येणारे आणि भारतीय जनता पक्षाचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि उपोषणकर्त्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. गिरीश महाजनांची विनंती आंदोलनकर्त्यांनी धुडकावून लावली आहे. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल, तर निवृत्त न्यायाधीशांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी केली पाहिजे, असेही देशमुख म्हणाले.

बापाला त्रास देता, है दुर्दैवी..

सर्वांना माहीत आहे प्रफुल्ल पटेल आमच्या पक्षात वरिष्ठ नेते होते. आता भाजप आणि नरेन्द्र मोदी यांचं गुणगान गात आहेत. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं. अनेक पदे दिली, अशा 83 वर्षाच्या बापाला त्रास देताय, हे दुर्दैवी आहे. २८ पक्षांचे लोक दोन दिवस चर्चा करून अनेक निर्णय घेतात. त्या बैठकीत अनेक समित्यांचं गठण झालंय. त्यांनी स्वतःची भूमिका बदलली म्हणून हे २८ पक्ष एकत्र आल्याचा भाजपनं धसका घेतला असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT