Nagpur News : असंघटित बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मुन्ना यादव यांनी पोलिस ठाण्यात घातलेला वाद विधानसभेच्या निवडणुकीत चांगलाच रंगणार असल्याचे दिसून येते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांना टार्गेट केले असल्याने भाजपच्यावतीने काय प्रतिक्रिया व्यक्त होते याकडे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी केलेल्या मुन्ना यादव यांनी, आर्थिक घोटाळ्यात वर्षभर जेलमध्ये राहून आलेल्या देशमुखांना यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. जो वाद झाला तो आमच्या कुटुंबीयातील होता. पोलिसांना मारहाण व शिवीगाळ केल्याचा देशमुखांचा आरोप चुकीचा आहे. फक्त शाब्दिक बाचाबाची झाली. देशमुखांनी आरोप करण्यापूर्वी सीसी टीव्ही तपासावे, असा सल्ला यादव यांनी त्यांना दिला.
यादव कुटुंबीयांमध्ये शनिवारी चांगलाच वाद झाला होता. मुन्ना यादव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्याला जखम झाली असताना पोलिसांनी त्याला तक्रार नोंदवायला ठाण्याच्या आत येऊ दिले नाही. डोक्यात गंभीर जखम असताना व रक्त वाहत असताना तातडीने त्याला उपाचारासाठी भरती करणे आवश्यक होते. त्यामुळे आपण संतापलो त्यातून पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचे मुन्ना यादव यांचे म्हणणे आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यास धक्काबुक्की केली, शिवीगाळ केल्याचा आरोप खोटा आहे. असे असताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे आरोप पूर्वग्रह दूषित आहेत. ते गृहमंत्री असताना शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून त्यांना अटक केली होती. असे असताना ते सातत्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दबाव टाकून आपणास फसवल्याचे आरोप करीत आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीत जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांचे सर्व खटाटोप सुरू आहेत. ते गृहमंत्री असताना आपणस एका प्रकरणात फसवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, कुठलेही पुरावे नसल्याने त्यांचे प्रयत्न फसले.
प्रत्येक हिवाळी अधिवेशनात आणि निवडणुकीत ते मुद्दामच आपणावर आरोप करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय निशाना साधत असल्याचा आरोप मुन्ना यादव यांनी केला. जो काही वाद झाला तो आमच्या कुटुंबीयात झाला. त्याचा राजकारणी संबंध नाही. पोलिसांवरसुद्धा कोणी दबाव टाकला नाही, असे असते तर पोलिसांनी गुन्हा दाखलच केला नसता, असेही यादव यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.