Chandrashekhar Bawankule and Nana Patole
Chandrashekhar Bawankule and Nana Patole Sarkarnama
विदर्भ

पटोले राहिले बाजूला आमदार बावनकुळेंवरच झाला गुन्हा दाखल...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला शिव्याही देऊ शकतो आणि मारूही शकतो’, असे वक्तव्य केल्यानंतर भाजप (BJP) नेत्यांनी राज्यभर त्यांच्याविरोधात आंदोलन पेटवले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही कोराडी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. नाना पटोलेंवर तर गुन्हे दाखल झालेच नाहीत, मात्र बावनकुळेंवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१८ जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समर्थकांसह कोराडी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल केली. तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी तेथेच त्यांनी ठिय्या मांडला आणि जोपर्यंत पटोलेंवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली. काही वेळाने पोलिसांनी आमदार बावनकुळेंना अटक केली. त्यानंतर काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांचे ठिय्या आंदोलन थांबले.

ठिय्या आंदोलनादरम्यान पोलिस स्टेशनसमोर गर्दी जमा केली आणि कुठेही सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही. अनेकांनी मास्क घातलेले नव्हते, असा ठपका ठेवत त्यांच्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार कृष्णा खोपडे यांनी नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलन करताना कोविडच्या नियमांचा भंग केला होता. इतकेच नव्हे तर ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असताना कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले होते. त्यासाठी महानगरपालिकेने त्यांनी नोटिस दिली आहे. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई मात्र करण्यात आलेली नाही. एकाच विषयासाठी भाजपच्या दोन आमदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली. पण एकावर गुन्हा दाखल झाला, तर दुसऱ्यावर नाही. त्यामुळेही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, रश्मी ठाकरे यांच्या विरुद्ध बोलल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, सुमित ठक्कर इतरांवर पोलिसांनी त्वरित कारवाई केली होती. आता हीच कृती पटोले यांच्याबाबत करावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. पटोले यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी सरकाराचा दबाव आहे का, अशी विचारणाही भाजपच्या नेत्यांनी पोलिस आयुक्तांना केली. अमितेशकुमार यांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. या प्रसंगी महामंत्री संजय बंगाले, बाल्या बोरकर, उपाध्यक्ष भोजराज डुंबे, संगठनमंत्री सुनील मित्रा, प्रदेश प्रवक्ता पॅनेलिस्ट चंदन गोस्वामी, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, विजय फणनवीस, सुमित मिश्रा आदी उपस्थित होते.

गैरसमजामुळे झाले ‘ते’ कृत्य..

महानगरपालिकेने आमदार कृष्णा खोपडे यांना नोटीस दिली होती. त्यामध्ये २४ तासांत उत्तर दाखल करण्यास बजावण्यात आले होते. आज त्यांनी नोटिसला उत्तर देताना केवळ गैरसमजामुळे ते कृत्य झाले. पण यानंतर असे होणार नाही, याची खबरदारी घेईन, असे महानगरपालिकेला कळविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT