यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा दिवस जसजसा नजीक येत आहे, तसतसे वातावरण तापत चालले आहे. काल (ता. २५) शिवसैनिकाची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर आज (ता. २६) सुप्रसिद्ध व्यंगचित्रकाराचे एक व्यंगचित्र चांगलेच व्हायरल होत आहे.
आज सकाळपासून आर्णी तालुक्यासह जिल्हाभर या व्यंगचित्राची चर्चा सुरू आहे. आर्णी येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक दहीफळे यांनी बाजार समिती निवडणुकीवर प्रकाश टाकणारे एक व्यंगचित्र सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. प्रस्थापित नेत्यांच्या कारभाराची पोलखोल करणारे हे व्यंगचित्र आहे.
निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली असून एकनाथ शिवसेना (शिंदे गट) भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी युती झाली. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नाराज झालेल्या लोकांना उमेदवारी देत आपल्यासोबत घेतले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच शिंदे गट शिवसेना, भाजप मनसे व उद्धव ठाकरे शिवसेना अशी तिहेरी पक्ष प्रचारात आघाडीवर आहेत.
बाजार समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत आर्णी येथील राजकीय अभ्यासक व सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक दहीफळे यांनी सोशल मिडीयावर "या साठी मते देणार..? विविध कार्यकारी सोसायटी, असा उल्लेख करत एक व्यंगचित्र व्हायरल केले, सोशल मिडियावरील व्हायरल झालेले हे व्यंगचित्र राजकीय वर्तुळात विविध चर्चा घडवून आणत आहे.
आर्णी विविध कार्यकारी सोसायटीची कोट्यवधी रुपयांनी वाट लावून आता आर्णी बाजार समितीची वाट लावण्यासाठी निघालेल्या पुढाऱ्यांबाबत मतदारांना जागरूक करण्यासाठी व्यंगचित्र काढून ते सोशल मिडीयावर टाकले, असे व्यंगचित्रकार विवेक दहीफळे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.
व्यंगचित्रामध्ये एक राजकीय पुढारी (Political Leader) खुर्चीवर बसलेला आहे. (त्याचा चेहरा दिसत नाही) त्याच्या एका पायाखाली विविध कार्यकारी सोसायटी तुडवली गेली आहे आणि पुढाऱ्याचा दुसरा पाय आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आहे. येथे आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचा फलक दाखवण्यात आला आहे. म्हणजे पुढाऱ्यांनी विविध कार्यकारी सोसायटीची वाट लावली आणि आता तेच बाजार समितीची वाट लावायला निघाले आहेत, असा संदेश देण्यात आला आहे. अशांना तुम्ही मते देणार आहात का, असा प्रश्न मतदारांना (Voters) उद्देशून करण्यात आला आहे.
कट्टर शिवसैनिक (Shivsena) असलेल्या फयाज सय्यद यांनी काल (ता. २५) आपल्या फेसबुक अकाऊंटवर ‘मतदार राजा जागा, हो तुझ्या खराब वेळी बाजार समितीत पाच हजार घेऊन टोकन देणारे संचालक घरी आले की, आपली वसुली करून घे… मताचे नंतर बघू आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक' (APMC Election) अशी पोष्ट व्हायरल करून शेतकऱ्यांसोबत टोकनचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.