sanket bawankule car .jpg sarkarnama
विदर्भ

Sanket Bawankule : संकेत बावनकुळेची ऑडीकार चालवणाऱ्या अर्जुनचे काँग्रेसशी 'कनेक्शन'

Rajesh Charpe

'ऑडीकार अपघाता'वरून शिवसेना ( ठाकरे गट ) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तुटून पडली आहे. मुंबईतून संजय राऊत रोज नवे-नवे धक्कादायक खुलासे करीत आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे नागपुरात दाखल झाल्या आहेत. असे असताना काँग्रेसने मात्र अद्याप यावर आक्रमक भूमिका घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या मागचा उलगडा झाला असून संकेत बावनकुळे याची ऑडी चालवणारा अर्जुन हावरे हा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. त्याचे वडील जितेंद्र ऊर्फ अंतू हावरे हे शहर काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष होते. 2007 मध्ये खामला प्रभागातून त्यांनी महापालिकेची निवडणूक लढली होती. काँग्रेसच्या ( Congress ) एका नेत्यासोबत त्यांची अजूनही खास जवळीक असल्याचे समजते.

रविवारी मध्यरात्री संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीकारने चार ते पाच जणांना धडक दिली. यावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे याच्यासह तीन जण बसले होते. यात अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवारचा समावेश आहे. अर्जुन हा ऑडीकार चालवत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अर्जुन आणि रोहित यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. दोघांनही मद्य पिल्याचं वैद्यकीय चाचणीतून पुढे आले आहे.

या प्रकरणी शिवसेना आक्रमक असताना काँग्रेसने हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. सुषमा अंधारे यांनी संकेत बावनकुळे हाच कार चालवता होत, असा आरोप केला होता. त्यावर शहर काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार विकास ठाकरे यांनी संकेत बावनकुळे हा कार चालवत नव्हता, असा दावा केला. "सुषमा अंधारे या मुंबईत असतात. हा अपघात माझ्या पश्चिम नागपूर मतदारसंघात झाला. त्यांच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे," असेही ठाकरे यांचे म्हणणे आहे.

"अर्जुन हावरे यांनी आपण कार चालवत होतो," असे सांगून सर्व आरोप स्वतःवर घेतले आहे. अर्जुनचे वडील जितेंद्र हावरे यांनी खामला प्रभागातून महापालिकेची निवडणूक लढली होती. भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश तोतवानी यांनी त्यांचा पराभव केला होता. गेल्या काही वर्षांपासून जितेंद्र हावरे हे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. अंतू या नावानेच ते परिचित आहेत. संकेत बावनकुळे आणि अर्जुन यांची व्यावसायिक मैत्री असल्याचे समोर आले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT