Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar : विरोधात असले तरी अजितदादांचा रुबाब तोच राहणार….

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा रुबाब काही वेगळाच आहे. तेव्हाच त्यांच्या पक्षामध्ये ते सर्वांचे लाडके दादा आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि अजित पवार यांना विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी मिळाली.

विरोधी पक्षात असले म्हणून काय झाले? त्यांचा रुबाब तो रुबाबच..! हा रुबाब कायम राखण्यासाठी त्यांच्या जुन्या मित्राने दादांच्या शब्दाला मान दिला अन् दादांची इच्छा पूर्ण झाली. झाले असे की, महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) असताना अजितदादा (Ajit Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. मुंबईच्या (Mumbai) मलबार हिल येथील `देवगिरी` हा बंगला वरिष्ठ मंत्र्यांना दिला जातो. मंत्री असल्यापासून जवळपास दहा वर्षे दादा याच बंगल्यात वास्तव्यास होते. 2014 ते 2019 या कालावधीत सत्तेवर नसताना त्यांना हा बंगला सोडावा लागला. 2019 मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पुन्हा याच बंगल्याला पसंती दिली. आता विरोधी पक्षनेते झाल्यावरही तो बंगला सोडण्याची दादांची इच्छा नव्हती आणि ती इच्छा त्यांनी आपले मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना बोलून दाखवली.

येवढेच नव्हे तर त्यासाठी दादांनी फडणवीसांना दोन पत्रही लिहिले आणि विरोधी पक्षनेता असलो तरी देवगिरी माझ्याकडेच राहू द्यावा, अशी विनंती केली. तसे पाहता देवगिरीवर फडणवीसांचाच अधिकार आहे. पण मित्रप्रेमापोटी फडणवीसांनी दादांची इच्छा पूर्ण केली. आता दादा विरोधी पक्षनेते असले तरी देवगिरीमध्ये असल्याने त्यांचा तो रुबाब कायम राहणार आहे. फडणवीस आता सागर बंगल्यावरच राहणार आहेत आणि देवगिरी दादांना द्यावा, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देवगिरी बंगला अजित पवारांकडे राहू द्यावा, असे परिपत्रक सरकारने काढले आहे.

फडणवीस-पवार मैत्रीचे किस्से..

फडणवीस आणि अजित पवार यांच्या मैत्रीचे इतरही किस्से सांगितले जातात. एकदा पुणे येथे झालेल्या बैठकीत पाणी पट्टी कर थोडाही वाढवून पुणेकरांवर अतिरिक्त बोझा लादण्याला अजित दादांचा विरोध होता. त्या बैठकीला शरद पवारांसह इतरही ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पण अजित दादांची त्या निर्णयावर नाराजी होती. तेवढ्यात फडणवीस अजित दादांना एकट्यात घेऊन गेले आणि काय समजावून सांगितले माहिती नाही. पण दोघेही परत येताच अजित दादांना त्या निर्णयाला सहमती दर्शवली.

२०१९ साली एका लग्नाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सोबत गेले होते. मुंबई ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते मुंबई असा विमान प्रवास त्यांनी सोबतच केला होता. वैजापूर येथील तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांचे चिरंजीव अजय व लोह्याचे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भाची माधुरी यांचा तो विवाह सोहळा होता. मग हे दोघे एकाच गाडीत आले का? मुंबईहून एकाच विमानात आले का? असे अनेक प्रश्‍न तिथे उपस्थित प्रत्येकाच्या मनात घोळत होते. आणि चौकशी अंती या सगळ्या प्रश्‍नांची उत्तर होकारार्थी मिळत होती. एकमेकांना आव्हान देणारे, घालून पाडून बोलणारे, सभागृहात ऐकमेकांची पिसे काढणारे हेच का ते मोठे नेते? अशी चर्चा देखील या निमित्ताने तेव्हा भरपूर रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT