Today Dr. Deshmukh joined the BJP : मंडल कमिशनचा अहवाल १९८०मध्येच सादर झाला होता. तेव्हा राजीव गांधीं सरकारने मंडल आयोग लागू केला असता, तर ५४ टक्के ओबीसी जनतेला तेव्हाच न्याय मिळाला असता. पण ओबीसींच्या दोन पिढ्या गारद करण्याचे काम गांधी परिवाराने केले आहे, असे डॉ. देशमुख यांनी ठामपणे सांगितले. ओबीसींच्या कल्याणाचा मुद्दा उचलल्यामुळे मला कॉंग्रेसमधून काढण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. (The Gandhi family is anti-OBC)
आज (ता. १८) डॉ. देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते म्हणाले, राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है’च्या प्रकरणात माफी मागितली. राफेलच्या प्रकरणात मागितली आणि ओबीसींच्या विषयात त्यांनी माफी मागावी, अशी सूचना मी केली, तर मलाच काढून टाकले. त्यामुळे गांधी परिवार हा ओबीसी विरोधी आहे, असे मी पुन्हा एकदा सांगतो. निलंबनानंतर मी स्पष्टीकरण दिलं, त्यानंतर दीड महिना उलटून गेला. तरीही पुढे काही होत नव्हतं.
दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे माझ्याकडे नाश्ता करण्यासाठी आले. तो दिवस शनिवार होता. त्यानंतर सोमवारी हकालपट्टीचे पत्र मला मिळाले. २०१९च्या निवडणूक नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून मी फडणवीसांच्या विरोधात लढलो होतो. पण विरोधात लढलेल्या माणसाच्या घरी जाण्याचे मोठं मन फडणवीसांनी दाखवलं. याबद्दल त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. त्यानंतर मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. देशमुख म्हणाले.
महाविकास आघाडीच्या त्या अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इकडे कधी दिसलेच नाहीत. फेसबुक लाईव्हशिवाय उपराजधानीत उद्धव ठाकरे दिसले नाही. यासाठी मी नेहमी आवाज उचलला, ते त्यांना रुचले नाही. भाजपमध्ये असे नाही, येथे खरोखरच परिवारासारखे वातावरण आहे. माझ्या कुटुंबावर कधी अडचण आली, तर याच लोकांनी मदत केली. कॉंग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे. कॉंग्रेस म्हातारी झाली, जिर्ण झाली आहे. परफॉरमन्स राहिलेला नाही, असे डॉ. देशमुखांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
आमदारकीसाठी मी इकडचा तिकडे जातो, असे नाही. येणाऱ्या २०२४मध्ये लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढणार नाही. तर केवळ ओबीसींच्या कल्याणासाठी काम करणार आहे. विदर्भातून नानागिरी, काटोलातून काकागिरी आणि सावनेरातून दादागिरी संपवायची आहे, असे म्हणत त्यांना नाव न घेता नाना पटोले, अनिल देशमुख आणि सुनील केदार यांना इशारा दिला आणि यासाठीच भाजपसोबत आलो आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले.
१९९९ माझे वडील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. माझे वडील रणजीत देशमुख होते. काका आमदार, सासरे आमदार, वडिलांच्या दोन आत्या आमदार होत्या. तेव्हा नाना पटोले, नितीन राऊत यांच्यासारख्या लोकांना आमदार केले. त्यांच्यासह कितीतरी लोकांना आमदार केले. त्यामुळे आमदारकी माझ्यासाठी मोठी नाही.
हे सांगताना त्यांनी नागपूर (Nagpur) जिल्हा सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याचा उल्लेख करून आमदार सुनील केदारांवर (Sunil Kedar) शरसंधान साधले. दीडशे खोक्याची माहिती २२ वर्षापूर्वी जिल्हा सहकारी बॅंकेमधील फडणवीसांना माहिती झाली. आता ते व्याजासकट १५०० खोके झाले आहेत. आता या खोकेवाल्यांना गाडण्याची वेळ आली आहे, असे डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.