Nana Patole, Rahul Gandhi and Ashok Chavan Sarkarnama
विदर्भ

Ashok Chavan's Resignation : राहुल गांधी ऐकेनात, नाना पटोलेंना घेरण्यात अपयश; म्हणूनच अशोक चव्हाणांनी...

Atul Mehere

Ashok Chavan's Resignation : २०१९ची निवडणूक झाली. त्यानंतर कधी नव्हे अशा घडामोडींनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्या सरकारमध्ये नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष बनले. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये काही घडामोडी झाल्या आणि नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. तेव्हापासून नानांचे पक्षांतर्गत विरोधक एकत्रित आले आणि सुरू झाले त्यांना घेरण्याचे प्रयत्न.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी नाना पटोलेंच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली. त्यानंतर महाराष्ट्रात कधी नव्हे ती काँग्रेस आक्रमक झाली. नानांच्या आक्रमक शैलीची दखल त्यांच्या विरोधकांनाही घ्यावी लागली. इकडे पक्षांतर्गत विरोधकांशीही नानांचा लढा सुरू होता. पण या सर्व घडामोडींत नानांनी पक्षांतर्गत विरोधकांना कधीही डोईजड होऊ दिले नाही. पक्षाचा विस्तार करताना अंतर्गत विरोधकांशीही ते दोन हात करीत होते.

बड्या नेत्यांनी दिल्लीच्या वाऱ्याही केल्या, पण नानांचा रथ सुसाट निघाला तो थांबण्याचे नावच घेत नव्हता. त्यामुळे अशोक चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांना पक्षात फारसा वाव उरला नव्हता. तिकडे राहुल गांधी नानांशिवाय कुणाचेही ऐकून घेत नाहीत. हे बघून ही टीम हताश झाली. राहुल गांधींचा नानांवरील विश्‍वास तसूभरही कमी झाला नाही. त्यानंतर अशोक चव्हाण आणि टीम हताश झाली आणि मग कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. अशोक चव्हाणांनी कॉंग्रेस सोडण्यामागे हेसुद्धा एक कारण सांगितले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण टीमने बऱ्याचदा नाना पटोलेंना घेरण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही, असेही राजकीय जाणकार सांगतात. महाराष्‍ट्रातील एका नेत्यामुळे अशोक चव्हाण त्रस्त होते, असे विधान कालच (ता. 12) संजय निरुपम यांनी केले. या घडामोडींवर निरुपम यांचे विधान बोलके आहे. एवढ्या सगळ्या घडामोडी झाल्यानंतरही प्रदेश कॉंग्रेसचा विश्‍वास कुठेही डळमळीत झालेला दिसत नाही, तर नव्या जोमाने भरारी घेण्याची भाषा नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह कॉंग्रेसचे नेते करीत आहेत.

नाना पटोलेंना घेरण्यासाठीही हा उठाव केल्याचे जाणकार सांगतात. राजीनामा नाट्य सुरू करायचे आणि प्रदेशाध्यक्षांना खाली खेचायचे, असाही प्रयत्न केला गेला. पण राज्यातील नाना विरोधकांना राहुल गांधी यांनी ‘हात’ दिला नाही. त्यामुळे अखेरीस अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे सूत्र सांगतात. अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ आणखी १७ नेते कॉंग्रेस सोडणार असल्याची माहिती आहे. यातील काही नेत्यांशी ‘सरकारनामा’ने बातचीत केली, पण त्यांनी साफ नकार दिला.

परवा-परवापर्यंत अशोक चव्हाणसुद्धा कॉंग्रेस सोडण्याच्या प्रश्‍नावर नकारार्थी उत्तर देत होते. पण काल त्यांनी झटका दिलाच. यातच देवेंद्र फडणवीस यांचे ‘आगे आगे देखो, होता है क्या’, हे विधान आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘यापुढे महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठमोठे पक्ष प्रवेश झालेले पाहायला मिळतील’, हे विधान या काळात बरेच काही सांगून जाते. भाजपमधील नेत्यांचा बळावलेला आत्मविश्‍वास सध्यातरी असेच काहीसे संकेत देत आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT