Nagpur News : काटोल विधानसभा मतदार संघातून भाजपने चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी आपला उमेरवारी अर्ज आज दाखल केला.
यावेळी त्यांनी काटोल-नरखेडच्या जनतेला, 'आता पप्पा नको आणि पप्पूसुद्धा नको', असा टोला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी देशमुख थापा मारत आहेत, जनतेची दिशाभूल करीत असल्याचाही त्यांनी आरोप केला.
काटोलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे माजी मंत्री आमदार अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्याऐवजी आता देशमुखांचे चिरंजीव, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख लढणार आहेत. आपण का लढणार नाही, याचे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले आहे.
अनिल देशमुख म्हणाले, "भाजपने (BJP) मला पुन्हा जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र रचले आहे. मी उमेदवारी अर्ज भरला असता, तर लगेच कारवाई केली जाणार होती. त्यामुळे सलील देशमुख येथून लाढणार आहेत". याबाबत चरणसिंग ठाकूर यांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले, 'काटोल-नरखेडच्या जनतेला देशमुखांचा पराभव करण्याचे ठरवून टाकले आहे. पराभव समोर दिसत असल्याने अनिल देशमुख यांनी माघार घेतली आहे. त्यांनी आपल्या मुलाला समोर केले आहे. मात्र आमच्या जनतेला, 'आता पप्पा नको आणि पप्पुसुद्ध नको'', असल्याचा टोला त्यांनी लागवला.
'सुमारे 25 वर्षांपासून अनिल देशमुख काटोलचे आमदार आहेत. सातत्याने मंत्रिमंडळात आहे. मात्र काटोलाचा विकास झाला नाही. शेजारचे सर्व मतदारसंघ विकसित झाले आहेत. त्यामुळे जनता त्यांना कंटाळली आहे. मुलाला सहानुभूती मिळावी याकरिता ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत आहेत. जेलमध्ये टाकणार असल्याची भीती व्यक्त करीत आहेत. मात्र याचा काही फायदा त्यांना होणार नाही. जनतेला सर्व कळून चुकले आहे', असेही चरणसिंग ठाकूर यांनी म्हटले.
सलील देशमुख यांनीच काटोलमध्ये उमेदवारी मागितली होती. ते शरद पवार यांनासुद्धा भेटले होते. अनिल देशमुखांना माघार घेतली नसती, तर मुलानेच बंडखोरी केली असती. त्यामुळे अनिल देशमुख लढणार नाही, असे जाहीर केल्याची चर्चा काटोल विधानसभा मतदारसंघात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.