Nagpur News : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या बदल्यात काँग्रेसने आपला पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. ठरल्याप्रमाणे दोन्ही काँग्रेसने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत.
आता पंढरपुरात आघाडीत बिघाडी असल्याने पूर्व नागपूरमधून कोण लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, हिंगणा मतदारसंघही शरद पवार यांनी पुन्हा आपल्याकडे घेतला आहे.
पूर्व विधानसभा मतदार संघातून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघासाठी अद्यापही काँग्रेस आग्रही आहेत. कालपर्यंत दिल्लीत बैठका झाल्या. विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी, संगीता तलमले, पुरुषोत्तम हजारे येथून लढण्यास तयार आहेत.
संगीता तलमले यांना काँग्रेस (Congress) नेत्यांनी शब्द दिला होता. त्यामुळे त्या सहा महिन्यांपासून तयारीला लागल्या होत्या. मध्यंतरी अभिजित वंजारी यांनीही पुन्हा या मतदारसंघात उडी घेतली होती. 2019ची निवडणूक लढणारे हजारे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र महविकास आघाडीत वरिष्ठ नेत्यांमध्ये वाटाघाटी झाल्याने यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नव्हता.
पंढपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने भागीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे पूर्व नागपूरचा विषय बंद झाला असे समजण्यात येत होते. आज मात्र पंढपुरात नवी घडामोड घडली. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीने अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी 'AB'फॉर्मसुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस येथे एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले.
हे बघता पूर्व नागपूरमध्ये काँग्रेससुद्धा उमेदवार टाकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यास अद्याप एकाही नेत्यांनी दुजोरा दिलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन बंद आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ऑऊट ऑफ कव्हरेज आहेत. येथून लढण्यास इच्छुक असलेले अभिजित वंजारी यांनी फोनवर प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाच विषय गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला हिंगणा विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता. तोसुद्धा परत घेतला आहे. रमेश बंग यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी 'AB'फॉर्मसह अर्जसुद्धा दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.