Bjp-ncp  Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Assembly Elections: भाजपचा 'हा' नेता हाताला घड्याळ बांधणार

Mahayuti seat sharing: महायुती आणि महाविकास आघाडीमुळे निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांची अडचण झाली आहे. यात काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. ती दूर करण्यासाठी आता वेगळे झेंडे आणि चिन्ह हाती घेण्याची तयारी केली जात आहे.

Rajesh Charpe

Mahayuti News : महायुती आणि महाविकास आघाडीमुळे निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांची अडचण झाली आहे. यात काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. ती दूर करण्यासाठी आता वेगळे झेंडे आणि चिन्ह हाती घेण्याची तयारी केली जात आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय मंत्री असणारे राजकुमार बडोले यांचाही समावेश आहे. ते राष्ट्रावादी काँग्रेसचे घड्याळ हाताला बांधणार असल्याचे समजते.

राजकुमार बडोले गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी अवघ्या 718 मतांनी त्यांना मात दिली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली. (assembly elections News)

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष खासदार प्रफुल पटेल महायुतीत सहभागी झाले. त्यांच्यासोबत आमदार चंद्रिकापुरे हे सुद्धा महायुतीत गेले. त्यामुळे अर्जुनी मोरगाव मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.

त्यामुळे बडोले यांच्यासमोर मतदारसंघाचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बडोले अस्वस्थ आहेत. त्यांनी आपल्या फाऊंडेशनच्यावतीने प्रचार आधीच सुरू केला आहे. तेव्हापासूनच ते भाजप सोडणार अशी चर्चा गोंदिया-भंडारा जिल्ह्यात सुरू आहे. मध्यंतरी ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची न्याय यात्रा घेऊन आले असता त्यांनीही बडोले यांच्याबाबत कार्यकर्त्यांना विचारणा केली होती. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे वर्चस्व आहे.

काँग्रेस ही जागा राष्ट्रवादीसाठी जागा सोडण्यास तयार नाही. महायुतीने मात्र राष्ट्रवादीला अर्जुनीची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बडोले हे प्रफुल पटेल यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

बडोले यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजय लांजेवार यांनी तब्बल 25 हजार 597 मते घेऊन बडोले यांचे गणित बिघडवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT