Akola News : सरकारला मराठा समाजाचा सरसकट आरक्षणात समावेश करावाच लागेल. विदर्भ, मराठवाड्यासह अनेक भागातील मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश होत आहे. छगन भुजबळ यांनी कितीही विरोध केला तरी पुराव्यांच्या आधारावर मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश होईलच, असं ठाम प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेल्या चरणगाव येथील मराठा आरक्षण महासभेत ते बोलत होते. सभेत जरांगे यांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
धनगर समाजानं आरक्षणासाठी व्यापक लढा उभारला पाहिजे, असं ते म्हणाले. मराठ्यांनी आतापर्यंत अनेकांवर विश्वास ठेवला. परंतु त्यांचा सातत्यानं घात झाला. अनेक वर्षांपासूनच्या सुमारे 35 लाख नोंदी आतापर्यंत आढळल्या आहेत. मराठा समाजाला 70 वर्षापूर्वी आरक्षण मिळालं असतं तर आज हा समाज जगाच्या पाठिवर एक नंबरवर राहिला असता. सरकारचं आणि आमचं ठरलय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ते कायदा पारीत करणार आहेत. त्यासाठी त्यांना आवश्यक ते पुरावे मिळाले आहेत. सरकारकडून 24 डिसेंबरला कायदा मंजूर होणार असं जरांगे म्हणाले.
गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, आंदोलन सुरू असताना पहाटे चारपर्यंत त्यांनी उपोषण मंडप सोडलं नव्हतं. त्यांनीच एक महिन्याचा वेळ मागितला होता. त्यांना 40 दिवसांचा वेळ देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पाठविलं होतं. आता महाजन यांनाही पुरावे मिळाले असतील. आता जर ते सरसकट आरक्षण देता येत नाही, असं म्हणत असतील तर त्यांची गाठ सर्वसामान्य मराठ्यांशी आहे, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा समाजातील लोकांच्या भरवश्यावरच अनेकांनी सत्ता उपभोगली आहे. आता या समाजासाठी काही तरी करायची वेळ आली तर सरकारनं मागं हटु नये. विदर्भ आणि खानदेशातील मराठ्यांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे. यासाठी विदर्भाच्या प्रत्येक कोपऱ्यात जनजागृती करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. कोही लोक दोन जातींमध्ये तेढ निर्माण करीत दंगल भडकविण्याचं काम करताहेत. त्यामुळं मराठा समाजानं सजग राहावे. ओबीसी समाज आणि मराठा ग्रामीण भागात एकत्र राहतात. गुण्यागोविंदाने नांदतात. त्यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करताना जरांगे म्हणाले की, त्यांनी ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना चिथावणी देत मराठा समाजाचे पोस्टर फाडायला लावले. पोलिसांचा फोन आल्यानंतर आपण तेथे असलेल्या कार्यकर्त्यांशी बोललो. परिस्थिती तात्काळ शांत झाली. भुजबळांना राज्यात दंगली भडकवायच्या आहेत. त्यामुळं यापुढं मराठा समाजानं हिंसक आंदोलन करू नये, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे 17 दिवस बेमुदत उपोषण केले. उपोषणामुळं वेदना झाल्या. त्यामुळं आता शरीर थकल्यासारखं वाटतं. आपल्याला काय वेदना होतात, त्रास होतो हे आपल्यासोबत सतत असलेल्यांनाच ठाऊक आहे. परंतु आपण मुद्दाम थांबत नाही. त्याचं कारण म्हणजे आपण थांबलो तर मराठा समाजासाठी उभारलेल्या लढ्याचं काही जण वाटोळं करतील. याच कारणामुळं आता थांबता येणार नाही. लढत राहावं लागणार आहे, असं जरांगे यांनी नमूद केलं.
पातूर तालुक्यातील चरणगावच्या शिस्त आणि आंदोलनाची मनोज जरांगे पाटील यांनी स्तुती केली. मराठा आरक्षणासाठी विदर्भातील चरणगाव आजपर्यंत लढा देत आहे. गावात अद्यापही साखळी उपोषण सुरू आहे. जालना येथे उपचार घेत असताना चरणगावातील ग्रामस्थ आपल्याला भेटले. त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर आपण त्यांना गावात सभा घेण्यासाठी शब्द दिला होता. तो शब्द आपण पूर्ण केला, असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.