Ramdas Athawale Sarkarnama
विदर्भ

Athawale On Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचे काय झाले? आठवलेंनी करून दिली आठवण !

Atul Mehere

Nagpur Political News : भाजप शिवसेनेसोबत २०१२पासून आरपीआय महायुतीत आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात सत्तेत सहभाग न मिळाल्याची खंत रामदास आठवले यांनी नागपुरात बोलून दाखवली. नागपुरात आज (ता. २३) दीक्षाभूमीवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना रवीभवन येथ पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Regrets that RPI is not getting the respect it deserves)

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यामध्ये महाराष्ट्रात एक मंत्रिपद तसेच दोन महामंडळ द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचेही मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तार १६, १७ तारखेला होणार होता. पण झाला नाही. विस्तार होणार होता आमचा, पण झाला अजितदादांचा. २०१२ पासून भाजप शिवसेनेनेसोबत आम्ही आहोत. आरपीआयला पाहिजे त्या प्रमाणात सहभाग मिळायला पाहिजे होता तसा मिळत नाही.

ज्या पद्धतीने मला मंत्रिपद दिलं, तसं महाराष्ट्रातसुद्धा मंत्रिपद द्यावे, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. आम्हाला एक मंत्रिपद द्यावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस मंत्रिपद देऊ, असा शब्द दिला आहे. लवकरात लवकर दोन महामंडळं द्यावे, जिल्हा कमिटी डीपीडीसी यांसह काही शासकीय कमिटीवर स्थान द्यावं, असेही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

केंद्र सरकारमध्ये आरपीआयचा आठवले गट भाजपसोबत आहे. आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे भाजप सत्तेवर आल्यानंतर रामदास आठवले यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार त्यांना केंद्र सरकारने सामाजिक न्याय मंत्रिपद दिलेही. परंतु राज्य सरकारमध्ये पाहिजे तसा वाटा मिळत नसल्याने सध्या आठवले आपल्या सहकाऱ्यांच्या पदरात काय पाडून घेता येते, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यात आरपीआयच्या मंत्र्यांचाही समावेश असावा, यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रयत्न करत आहेत. आम्हाला योग्य तो न्याय देण्यात येईल, असा शब्द भाजपनं दिला आहे. त्यामुळे आमच्या अपेक्षा लवकरच पूर्ण होतील, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.

आतापर्यंतच्या अनेक सरकारांनी सत्तेपासून दलित समाजाला दूर ठेवलं आहे. त्यामुळे केंद्रात भाजपने रिपब्लिकन विचारसरणीच्या लोकांना मंत्रिपदावर संधी दिली. अगदी त्याच पद्धतीने राज्यातील महायुती सरकारने रिपब्लिकन विचारसरणीच्या लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देणे गरजेचे आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टीनं दिलेला शब्द, या पार्टीचे नेते पाळतील आणि त्यातून रिपब्लिकन जनतेला व त्यांच्या लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात योग्य ते स्थान मिळेल, अशी अपेक्षाही रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आरपीआयला मंत्रिपद मिळालं नसलं तरी आम्ही नाराज नाही. फक्त सरकारला स्मरण करून देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT