Sunny Deon, Bacchu Kadu and Narendra Bhondekar Google
विदर्भ

Bachchu Kadu At Bhandara : भोंडेकरांच्या मतदारसंघात बच्चू कडूंचा ‘गदर-२’, सुरेवाड्यात आज जाहीर सभा !

अभिजीत घोरमारे

Bhandara District Political News : २०२४च्या लोकसभेसोबतच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरात तयारीला लागले आहेत. अशात बच्चू कडू भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Bachu Kadu has already announced that he will contest 25 assembly elections)

प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील २५ विधानसभा लढविणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. सद्यःस्थितीत बच्चू कडूंनी सर्व लक्ष भंडाऱ्याकडे वळविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (ता. १४) संध्याकाळी सुरेवाडा येथे बच्चू कडूंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

पवनीत प्रहारचा ‘गदर १’ हिट

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या धरतीवर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पवनीत एक विराट आंदोलन नुकतेच करण्यात आले. तब्बल पाच ते सात हजार पीडित शेतकरी आपल्या न्याय मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात वन विभागाच्या विरोधात उभे ठाकले होते. भंडारा जिल्ह्यात प्रहार जनशक्ती संघटनेच्या इतिहासात 'न भूतो न भविष्यति’ असे शेतकऱ्यांचे एक विराट आंदोलन पवनी येथे उभे झाले.

या आंदोलनाला बच्चू कडूंनी ‘गदर’ संबोधले होते. तसे पोस्टर्स, बॅनर्सही तेव्हा शहरभर लागले होते. पवनीत प्रहारचा ‘गदर १’ हिट झाला आणि प्रहारला मिळत असलेला जनतेचा उत्तम प्रतिसाद बघता बच्चू कडू यांनी आज सुरेवाडा येथे जाहीर सभा घेत ‘गदर २’ आयोजित केला आहे. या सगळ्या हालचालींवरून भंडारा-पवनी विधानसभा लढविण्याचा चंग प्रहारने बांधल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणूक आणि भोेंडेकर

पवनीच्या आंदोलनानंतर सुरेवाडा येथील होणारी जाहीर सभेचा सध्यातरी हाच अर्थ काढता येऊ शकतो. भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर शिंदे गटाचे आहेत. त्यांच्या या क्षेत्रात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सनी देओल बनत पवनीत ‘गदर १’ हिट केल्यानंतर आता आज सुरेवाडा येथे जाहीर सभा घेत ‘गदर २’ करण्याचे ठरवलेले दिसतेय.

प्रहारला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना धडकी भरणे साहजिक आहे. आतापर्यंत शिवसेना - ठाकरे गट भोंडेकरांना प्रतिस्पर्धी होता. आता प्रहारच्या रूपाने भोंडेकरांना दुसरा बलाढ्य प्रतिस्पर्धी मिळाल्याचे बोलले जात आहे.

आधीच घटत चाललेल्या लोकप्रियतेने आमदार भोंडेकर त्रस्त झाले आहेत. त्यात आता आमदार बच्चू कडूंचे ‘गदर’चे ‘एपिसोड’ वाढत चालले आहेत. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक आमदार भोंडेकर यांच्यासाठी अवघड जाऊ शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT