Amravati Political News : राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे तीव्र नाराज असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यातल्या त्यात त्यांची नाराजी भाजपवर अधिक आहे. अशात सोमवारी (ता. २५) आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान करीत भारतीय जनता पक्षावर ‘प्रहार’ केला आहे. (BJP was directly placed in the cage of the accused)
भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली. परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेली कारवाई ही पंकजा मुंडे यांच्यावर थेट हल्ला असल्याचे मानले जात आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशात प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
पंकजा मुंडे या मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. अनेकदा त्यांनी याबाबत वक्तव्येही केली आहेत. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, असेही त्या म्हणाल्या होत्या. अलीकडे पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली. भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याला सोबत न घेता त्या महाराष्ट्रभर फिरल्या. मुंडे यांच्या या कृतीमुळे दुखावलेल्या नेत्यांनीच त्यांच्यावर कारवाई सुरू केल्याचे विधान आमदार बच्चू कडू यांनी केले होते.
जीएसटी विभागाने आताच कशी काय साखर कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात या कारखान्यावर छापा घातला होता.
त्यावेळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररीत्या १९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी जीएसटी विभागाने शनिवारी पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस पाठवली होती. रविवारी केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
साखर कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईची सुरुवात एप्रिल महिन्यापासून झाली असली तरी त्यालाही भाजपमधील अंतर्गत राजकारणच जबाबदार असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे या प्रस्थापित व प्रचंड वजन असलेल्या नेत्यांशी थेट स्पर्धा करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांना अशा कारवाईला सामोरे जावे लागल्याचे राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी अकोला दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनीही पंकजा मुंडे यांची कोंडी होत असल्याचे म्हटले होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे कोणत्या पक्षात जावे, याबाबत त्या संभ्रमात आहेत. परंतु योग्य वेळी त्या निर्णय घेतील, असे संकेत खडसे यांनी दिले होते.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.